Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भित्र्या भारतीय सेलिब्रिटींनो, कुठे आहे तुमचा विकलेला आत्मा आणि ह्रदय? ; तेजस्वी यादव भडकले

 

 

पाटणा : वृत्तसंस्था । परदेशातून भारतातील कोरोना दुर्दशेबद्दल बद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. विविध सेलिब्रिटी आणि नेत्यांनी याबद्दल मतं मांडली आहेत. याचाच संदर्भ देत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी भारतातील सेलिब्रिटींच्या मौनावर संताप व्यक्त केला आहे.

 

देशात कोरोनामुळे अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांसह नातेवाईकांचे बेड आणि औषधींचा शोध घेताना हाल होत असून, महाराष्ट्र, दिल्लीसह राज्यातील अनेक ठिकाणी रुग्णांचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाल्याचीही घटना घडल्या. भारतातील परिस्थितीवर देश विदेशातून चिंता व्यक्त करण्याबरोबरच केंद्र सरकारवर टीकाही होत आहे. मात्र, यावर भारतीय सेलिब्रिटींनी मौन धारण केल्यानं राजदचे नेते तेजस्वी यादव चांगलेच भडकले आहेत. भित्र्या भारतीय सेलिब्रिटींनो, असा उल्लेख करत त्यांनी फटकारलं आहे.

 

तेजस्वी यादव यांनी ट्विट करत फटकारलं आहे. “प्रिय भित्र्या भारतीय सेलिब्रिटींनो, थोडासा कणा दाखवा, थोडसं तरी बोला. तुमच्यासाठी पूज्य असलेल्या व्यक्तीच्या चुकीच्या प्राथमिकतांमुळे ऑक्सिजनसारख्या मुलभूत गोष्टीसाठी तुमचे देशबांधव एक दुसऱ्यांच्या जीवांसाठी प्रत्येक सेंकदाला मरत आहेत. तुमचा विवेक कुठे आहे. कुठे आहे तुमचा विकलेला आत्मा आणि ह्रदय? देशाशी प्रामाणिक रहा, सरकारशी नाही,” असं म्हणत तेजस्वी यादव यादव यांनी सेलिब्रिटींच्या मौनावर संताप व्यक्त केला.

 

 

“शेतकरी आंदोलनावरून जेव्हा जगभरातील नागरिकांनी असंवेदनशील सरकारवर टीका केली, तेव्हा सरकारच्या आदेशावरून यांनी देशाचा अतंर्गत मुद्दा असल्याचं सांगत नकली नाराजी व्यक्त केली. आता त्यांची निवडक नाराजी कुठे आहे? सगळीकडे भारतीय मरत आहेत. प्रत्येक क्षणाला मरत आहेत, पण या पोकळ आदर्शांना थोडाही त्रास नाहीये,” अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी भारतीय सेलिब्रिटींना फटकारलं आहे.

 

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गसह अनेक परदेशी कलाकारांनी याला पाठिंबा दिला होता. त्यावरून भारतातील अभिनेता अजय देवगन, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर या प्रमुख सेलिब्रिटींसह अनेक कलाकारांनी हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचं ट्विट केलं होतं. त्याचाही उल्लेख तेजस्वी यादवांनी केला आहे.

Exit mobile version