Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाविकांविना सुने पडले त्रिविक्रम मंदिर !

शेंदुर्णी, ता. जामनेर विलास पाटील । कोरोनाच्या आपत्तीमुळे येथील त्रिविक्रम मंदिरात तब्बल २८० वर्षांमध्ये यंदा पहिल्यांदाच आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात शुकशुकाट दिसून आला. भाविकांविना हे मंदिर आज अक्षरश: सुने पडल्याचे शेंदुर्णीकरांनी अनुभवले.

याबाबत माहिती अशी की, खान्देशातील प्रतिपंढरपूर म्हणून येथील श्री भगवान त्रिविक्रम मंदिरात सालाबाद प्रमाणे होणारा आषाढी एकादशी यात्रोत्सव कोरोना संसर्ग महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा रद्द झाला. परिसरातील जवळपास एक लाख भाविक देव दर्शनापासून वंचित राहिले. आषाढी एकादशीच्या देव दर्शनाची परंपरा खंडित झाली मंदिरात होणारा श्री त्रिविक्रम भगवान की जय,कडोबा महाराज की जय ,टाळ मृदुंग ,दिंडी, पालख्या व सर्व गावांत परिसरातील भक्तिमय सोहळा ,लांबलचक दर्शन बारी,पोलिसांनी बंदोबस्तासाठी लावलेला फोजफाटा या सर्व वातावरणातील आषाढी सोहळ्याला मुकल्या मुळे भक्तांच्या मनातील हुरहूर त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसली. मंदिरात जाता येत नसल्याची खंतही अनेक वारकरी मंडळींनी बोलून दाखविली परंतु कोरोना प्रकोपाने सर्वत्र हतबलता दिसून आली.

यंदा काल रात्री १२ वाजता साध्या पद्धतीने व शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून सोशल डिस्टंसिंग चा वापर करून ५ जोडप्यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने विधीवत भगवान त्रिविक्रमाची पूजा करण्यात आली. या पूजेचा विधी गत कार्यक्रम मंदिर ट्रष्ठी शिरीष भोपे यांनी केला. कडोबा महाराज संस्थानचे आठवे गादी वारस हभप शांताराम बुवा भगत यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करत पालखी सोहळा रद्द केला. शासनाच्या नियमांचं पालन करीत सर्व दिवसभरातील कार्यक्रम रद्द करण्यात आले. रात्री पूजा, अभिषेक व महाआरती होऊन गेले कित्येक दिवसापासून बंद असलेले मंदिर पुन्हा बंद करण्यात आले. रात्री बारा वाजेपासून मंदिरावर सहाय्यक उपपोलीस निरीक्षक किरण बर्गे,देवडे, यांनी मंदिराला पोलीस तैनात केले होते. ते दिवसभर तैनात होते. आदल्या दिवशीच मंदिराच्या सर्व प्रवेश मार्गावर बॅरिकेटिंग करण्यात आले होते. त्यामुळे सर्व गावकर्‍यांनी व भाविकांनी आपापल्या घरातील विठ्ठल रुक्माई च्या प्रतिमेची पूजा-अर्चा आपापल्या घरातच करून आषाढी एकादशी साजरी केली. दरवर्षी आषाढी एकादशीला भक्तांच्या गर्दीचे लोंढे, ठिकठिकाणी वाटप होणारी साबुदाणा खिचडी, भगर,केळी, चहा,केशरी दूध वाटप हे अनुभवायला मिळाले नाही.

Exit mobile version