Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भावनाच मेल्यात , भीती वाटत नाही , धैर्य वाढले ; दफनभूमी कर्मचाऱ्यांची मनस्थिती !

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना रुग्णांचे मृतदेह पुरताना मुंबईतल्या दफनभूमीत काम करणारे सय्यद मुनीर कमरूद्दीन यांच्या भावनाच मेल्यात जणू. “आता मला कोरोनाची भिती वाटतच नाही. धीराने या गोष्टींना सामोरा गेलो. आता भिती नाही, धैर्य आलंय” असं ते सांगतात तेंव्हा काळाने शिकवलेली कर्तव्यकठोरता अशी निष्ठूरही असू शकते ? , असे सर्वांना जाणवते

 

५२ वर्षांचे कमरुद्दीन गेल्या काही दिवसांमध्ये दिवसाचे २४ तास कोरोना रुग्णांच्या मृतदेहांच्या संपर्कात आहेत.

 

भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून काही राज्यांमध्ये   भीषण रूप पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून त्यातही मुंबई रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचं चित्र  काही दिवसांमध्ये दिसलं  यासोबतच मुंबईत मृतांचा आकडा दोन महिन्यात पुन्हा दोन अंकी होऊन आता तीन अंकी होतोय की काय, अशी चिंता वाटू लागली आहे. मुंबईतल्या स्मशानभूमी आणि दफनभूमीबाहेर अंत्यविधींसाठी लागलेल्या रांगा

कोरोनाचं हेच विदारक वास्तव स्पष्ट करत आहेत. मुंबईतल्या दफनभूमीमध्ये कर्मचारी २४ तास काम करत असूनही त्यांना उसंत मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर येऊ लागलं आहे.

 

 

 

कामरूद्दीन यांनी आपला दिनक्रम सांगितला. त्यातून मुंबईत कोरोनानं किती गंभीर रुप धारण केलं आहे याची प्रचिती यावी. “मी आणि माझे सहकारी काही दिवासांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांचं दफन करण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहोत. हेच आमचं एकमेव काम आहे. मृतदेह घ्यायचे, रुग्णवाहिकेतून बाहेर काढायचे आणि त्यासाठी खणलेल्या खड्ड्यांमध्ये पुरायचे”, असं कमरुद्दीन सांगतात. गेल्या वर्षभरात आपण सुट्टीवरच गेलो नसल्याचं सांगताना कमरूद्दीन यांच्या डोळ्यात आप्तस्वकीयांना भेटण्याची आस दिसून  आली !

गेल्या २५ वर्षांपासून मृतदेह पुरण्यासाठी खड्डे खणून त्या मृतदेहांचं दफन करण्याचं काम करमरुद्दीन करत आहेत.

 

रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधव उपवास करतात. पण कमरुद्दीन यांना तेही शक्य होत नाही. “माझं काम फार कठीण आहे. मला खूप तहान लागते.  कारण मला खड्डे खणावे लागतात. ते माती टाकून झाकावे लागतात. मृतदेह उचलावे लागतात. हे सगळं करताना मी उपवास कसा करू शकतो?” असा सध्या काहीच उत्तर नसलेला प्रश्न ते विचारतात आणि समोरच्यालाच निरुत्तर करतात !

 

मुंबईमध्ये बुधवारी दिवसभरात ४ हजार ९६६ नवे रुग्ण सापडले त्यामुळे मुंबईतल्या एकूण बाधितांचा आकडा ६ लाख ४० हजार ५०७ झाला असून त्यापैकी ६५  हजार ५८९ अॅक्टिव्ह रुग्णांवर मुंबईतल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये आणि कोविड केंद्रांवर उपचार सुरू आहेत.  काल दिवसभरात मुंबईत ७८ रुग्णांचा  मृत्यू झाला एकूण मृतांचा आकडा आता १२ हजार ९९० झाला आहे.

Exit mobile version