Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काँग्रेसने अधिकृतरित्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून येत्या ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही घेतला आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी ही माहिती दिली.

खेडा म्हणाले, “आठ तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होवो यासाठी आम्ही प्रयत्न करु.”

गेल्या १० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकारशी सातत्याने अपयशी होणाऱ्या चर्चा आणि कडाक्याच्या थंडीतही हजारो शेतकरी दिल्ली आणि एनसीआरमध्ये धरणे आंदोलनाला बसले आहेत. रविवारी सकाळपासूनच शेतकरी दिल्लीच्या सिंघु, टीकरी, दिल्ली गाजियाबाद, चिल्ला आणि इतर सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. शनिवारी पुन्हा एकदा सरकारसोबत चर्चा निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र भावना आहेत. दिल्लीच्या सीमांवर असलेल्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणाच केली आहे. मागण्यापूर्ण झाल्याशिवाय मागे फिरणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version