Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारत-चीन सीमावादावर तोडगा निघण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । अनेक महिन्यांपासून भारत-चीनमध्ये सुरु असलेल्या सीमावादावर लवकरच तोडगा निघू शकतो. लडाखमधल्या काही भागातून माघार घेण्यासंबंधी दोन्ही देशांच्या लष्करामध्ये एकमत झाले आहे.

एप्रिल-मे आधी दोन्ही देशांचे सैन्य ज्या ठिकाणी होते, त्याच स्थानावर दोन्ही देशाचे सैनिक तैनात होतील. चुशूलमध्ये सहा नोव्हेंबरला आठ कॉर्प्स कमांडर स्तराची बैठक झाली. त्या बैठकीत दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये माघारीचा फॉर्म्युला ठरला आहे.

पूर्व लडाख सीमेवर तणाव कमी करण्याचा जो फॉर्म्युला ठरलाय, तो तीन टप्प्यांचा आहे. पुढच्या आठवडयात त्यावर अमलबजावणी केली जाईल. आधी सैन्य वाहने मागे घेतली जातील. यात रणगाडे सुद्धा आहेत. एलएसी म्हणजे नियंत्रण रेषेपासून एका ठराविक अंतरापर्यंत दोन्ही देश आपापले रणगाडे, सैन्य वाहने मागे नेतील.

सहा नोव्हेंबरला झालेल्या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव नवीन श्रीवास्तव आणि डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्सचे ब्रिगेडीयर घई उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरुन सलग तीन दिवस ३० टक्क्यापर्यंत सैन्य मागे घेतले जाईल. धन सिंह थापा पोस्ट पर्यंत भारतीय सैन्य मागे येईल तर चिनी सैन्य फिंगर आठ या त्यांच्या मूळ जागेपर्यंत परत जाईल.

तिसऱ्या टप्प्यात पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरुन दोन्ही देशांचे सैनिक माघारी फिरतील. येथील उंचावरील भागामध्ये भारतीय सैन्य तैनात आहे. वैमानिकरहित विमानांच्या माध्यमातून या माघारीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येईल.

गलवान खोऱ्यात चीनने दगाबाजी केल्यामुळे भारत या विषयावर खूप काळजीपूर्वक संभाळून पावले उचलत आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला. यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनच्या बाजूला ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते.

 

Exit mobile version