Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारत आणि चीनच्या सैन्यात पुन्हा चकमक

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । थंडीतील काही काळाच्या विसाव्यानंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा पूर्व लडाखमधील अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे पुन्हा चकमक झाल्याचे वृत्त आहे

 

आतापर्यंत दोन्ही देशांच्या सैन्यात एक चकमक झाल्याचेही सांगण्यात आले. या वेळच्या चकमकीत काही प्राणहानी झाली की नाही हे समजू शकले नाही. गेल्यावर्षी १५ जूनला गलवान नदीच्या खोऱ्यात झालेल्या चकमकीत वीस भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते.

 

चीनने एप्रिल २०२१ च्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा घुसखोरी सुरू केली. त्या वेळी काही चिनी ड्रोन विमाने भारतीय हद्दीत आली होती व त्यांनी या भागाची टेहळणी केली असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. मे व जून महिन्यात डेमचोक व चुमार या दक्षिण लडाखमधील भागात गस्त सुरू असताना तेथे नागरी वेशातील चिनी सैन्याचे अस्तित्व आढळून आले. मे महिन्याच्या मध्यावधीत  भारतीय सैन्याने चिथावणी दिली नसतानाही चिनी सैन्याने अनेक ठिकाणी संघर्षाचा पवित्रा घेतला, त्यामुळे तणाव निर्माण होऊन भारतीय सैन्य पुन्हा तैनात करण्यात आले.

 

दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आल्याने आता तेथे पुन्हा एकदा संघर्षाची चिन्हे आहेत. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीपल्स लिबरेशन आर्मीने त्या भागात एक किंवा दोन एस ४०० हवाई क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केल्या असून हवाई क्षेत्रात भारताचे वर्चस्व कमी केले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचाली पँगॉग सरोवराच्या उत्तर किनारा परिसरात वाढल्या असून विशेष करून सिरीजाप येथे त्यांनी तोफगोळे व इतर साधनसामग्री आणली आहे.

 

पीपल्स लिबरेशन आर्मीने फेब्रुवारी २०२१ मधील निर्लष्करीकरणाचा करार धुडकावून आता पुन्हा एकदा छावण्यांमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या माहितीनुसार जून २०२० पासून रुटॉगसह अनेक ठिकाणी तसेच पँगाँग सरोवराच्या पूर्व टोकाला चीनने सामर्थ्य वाढवले होते.

 

पीपल्स लिबरेशन आर्मीने अनेक ठिकाणी रडार लावले असून हेलिपॅडही उभारले होते. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी काही क्षेपणास्त्रेही तेथे आहेत. काही भागात चिलखती वाहनेही दिसून आली होती. काही भूमिगत खंदकही पीएलएने बांधले असून झाईदुल्ला, कांगझीवार, दहोंगलिउटान येथे ते आहेत. पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी) च्या तळांवर हेलिपॅड आहेत, तेथे अनेक हेलिकॉप्टर्स दिसून आली आहेत. देपसांग व दौलत बेग ओल्डी या काराकोरम खिंडीच्या पायथ्याशी असलेल्या भारताच्या उत्तरेला असलेल्या ठिकाणी चिनी सैन्याची जमवाजमव करण्यात आली होती.

 

चीनचा डोळा देपसांगवर आहे. कारण त्या भागामुळे भारतीय सैन्य जी २१९ रस्त्याकडे जाऊ शकते जो चीनचा संवेदनशील पश्चिामी महामार्ग आहे, जो तिबेट व शिनजियांग यांना जोडतो. त्यातून पीएलए व पाकिस्तानी लष्कर यांच्यात विश्वासाचे वातावरणही तयार झाले आहे. शिवाय त्यामुळे भारताच्या उत्तर टोकाकडील काराकोरम खिंड, दौलत बेग ओल्डी, सियाचेन हिमनदी ही क्षेत्रे टप्प्यातून तुटत जातात.

 

मे २०२० मध्ये घुसखोरी केल्यापासून पीएलएने दक्षिण गलवानमधील गोग्रा व हॉट स्प्रिंग क्षेत्रातून माघार घेण्यास नकार दिला आहे. गोग्रा चौकी ही भारतासाठी संवेदनशील असून तेथे अजूनही सैन्य तैनात आहे. पीपी १७ ए बिंदूजवळ भारतीय हद्दीत अर्धा किलोमीटर आतपर्यंत चीनने घुसखोरी केली आहे. पीपी १७ व पीपी २३ या ठिकाणी चीनने गोग्रा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जमवाजमव केली असून तेथील तोफगोळा, दारूगोळा, हवाई संरक्षण यंत्रणा, अवजड वाहने अगदी कमी काळात भारतात येऊ शकतात. पँगाँग सरोवराच्या दक्षिणेला कैलाश रेंज येथे चिनी सैन्याने पुन्हा ताबा घेतला असून ब्लॅक टॉप व हेल्मेट हे सोडलेले भाग पुन्हा काबीज केले आहेत.

 

Exit mobile version