Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतीय हॉकी महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत

 

टोकियो : वृत्तसंस्था । भारतीय महिला हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

 

‘अ’ गटात दक्षिण आफ्रिकेला ४-३ ने पराभूत केल्यानंतर ब्रिटेनवर पुढची वाटचाल अवलंबून होती. ब्रिटेनच्या महिला संघाने आयर्लंडवर २-० ने मात केल्याने भारताचं उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. २ ऑगस्टला ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीचा सामना असणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य सामन्यात नेदरलँड विरुद्ध न्यूझीलंड, स्पेन विरुद्ध ब्रिटेन, तर जर्मनी विरुद्ध अर्जेंटीना सामना रंगणार आहे.

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतासाठी वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयलने एक गोल केला. वंदना कटारिया ऑलिम्पिक सामन्यात हॅट्ट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. वंदना कटारियाने पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला शानदार सुरुवात करून दिली आणि चौथ्या मिनिटाला गोल केला. मात्र, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणात बरोबरी साधली. दुसऱ्या क्वार्टरमध्येही वंदनाने आक्रमक खेळ दाखवत स्कोअर २-१ असा केला. दक्षिण आफ्रिकेने मात्र भारताच्या अत्यंत कमकुवत संरक्षण रेषेला दुसऱ्यांदा छेद दिला. पूर्वार्धात सामना २-२ असा बरोबरीत होता.

 

 

तिसऱ्या क्वार्टरमध्ये नेहा गोयलच्या गोलच्या मदतीने भारताने पुन्हा एकदा जबरदस्त सुरुवात केली आणि आघाडी ३-२ अशी वाढवली. पण दक्षिण आफ्रिकेने जबरदस्त पुनरागमन केले आणि तिसरा गोल केला. सामन्याच्या ४९व्या मिनिटाला कटारियाने तिसरा गोल करत भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली.

 

Exit mobile version