Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतीय संघाचा दारूण पराभव; न्यूझीलंडने जिंकली मालिका

क्राईस्टचर्च । येथे सुरू असणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यात यजमानांची टिम इंडियाचा सात गडी राखून पराभव करत कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत कालच्या ६ बाद ९० धावांवरून आजचा खेळ सुरू करणारा भारतीय संघ १२४ धावांत तंबूत परतला. मयांक अग्रवालला ट्रेंट बोल्टनं त्याला ३ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर पृथ्वी शॉ ( १४) टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. कॉलीन डी ग्रँडहोमनं टीम इंडियाचा कर्णधार विराटला ( १४) पायचीत केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्‍वर पुजारा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तथापि, ते मोठी भागिदारी करू शकतले नाही. रहाणे (९) आणि पुजारा ( २४) हे दोघेही माघारी परतले. तिसर्‍या दिवसाच्या सकाळच्या सत्रात रिषभ पंत आणि हनुमा विहारी हेदेखील अपयशी ठरले. यामुळे भारताचा दुसरा डाव १२४ धावांत गडगडला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी केवळ १३२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. ट्रेंट बोल्टने चार आणि टीम साऊदीने ३ विकेट्स घेतल्या.
यानंतर न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी पहिल्या विकेटसाठी चांगली भागिदारी केली. लॅथमला ५२ धावांवर उमेश यादवनं माघारी पाठवलं. त्यानंतर आलेला केन विलियम्सनही ( ५) लगेच बाद झाला. ब्लंडलने ५५ धावांच्या खेळीत ८ चौकार व १ षटकार खेचले. त्याला जसप्रीत बुमराहनं बाद केले. न्यूझीलंडने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. यासोबत यजमानांनी कसोटी सामन्यांची मालिकादेखील २-० अशी जिंकली आहे.

Exit mobile version