Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव येथे धरणे आंदोलन

chalisgaon dharne

चाळीसगाव प्रतिनिधी । राज्य सरकारने जनतेचा विश्‍वासघात केल्या असल्याचा आरोप करून आज भारतीय जनता पक्षातर्फे येथील तहसील कार्यालयासमोर आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील, आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासह योगाचार्य वसंतराव चंदात्रे, प्रीतमदास रावलानी, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, बाजार समिती सभापती सरदारशेठ राजपूत, संजय गांधी निराधार समिती तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य उद्धवराव माळी, महिला आयोग सदस्या देवयानीताई ठाकरे, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्‍वर पाटील, माजी मार्केट सभापती रविंद्र चुडामण पाटील, मच्छिंद्र राठोड, मार्केट सदस्य विश्‍वजित पाटील आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण आपल्या मनोगतातून महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर आसूड उगारले. ते म्हणाले की, भाजपाचा विश्‍वासघात करुन काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱयांचा विश्‍वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असतांना शिवसेनेचे पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्‍वासन पाळलेले नाही. या सरकारला भाजपा सरकारच्या विकासकामांना स्थगिती देण्याशिवाय काही करता आले नाही. चाळीसगाव तालुक्यातील कत्तलखाना, चाळीसगाव – मालेगाव रस्ता दुरावस्था, नगरपालिका मुख्याधिकारी, शहरातील भूमिगत वीजतारा, खराब बसेस, कृषी विभागातील रिक्त पदे या अनेक ज्वलंत प्रश्‍नांबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र आज महिना उलटला तरी त्याबाबत कार्यवाही झाली नाही. मुख्यमंत्र्यांचा सुद्धा धाक शासन – प्रशासनाला राहिला नाही. म्हणून एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्‍न लावून धरण्याची जबाबदारी आपली असून पुढील काळात या निष्क्रिय सरकारला जागे करण्यासाठी मी विधानसभेबरोबरच रस्त्यावर उतरून आंदोलन करेन असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.

Exit mobile version