Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतासाठी धोक्याचा इशारा, चीन पोहचला अरुणाचलच्या सीमेजवळ

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था| भारतासाठी धोक्याचा इशारा ठरू शकणार असा रेल्वेमार्ग चीनने तयार केला आहे चीन या रेल्वेमार्गामुळे अरुणाचलच्या सीमेजवळ पोहचला आहे

चीनने अरूणाचल प्रदेशच्या भारतीय सीमेजवळ असणाऱ्या तिबेटमधील ल्हासा आणि नायींगशी शहरांना जोडण्यासाठी रेल्वे मार्गासाठी रुळ टाकण्याचं काम गुरुवारी पूर्ण केलं. तिबेटमधील छिंघाई-तिबेट रेल्वेनंतर शिचुआन-तिबेट रेल्वे मार्ग हा तिबेटला मेन लॅण्ड चायनाशी जोडणारा दुसरा मुख्य मार्ग ठरणार आहे. हा मार्ग छिंघाई-तिबेट पठाराच्या आग्नेय दिशेकडून जाणार आहे. विशेष म्हणजे हा प्रदेश जमीनीखालील भौगोलिक हलचालींसाठी जगभरात ओळखला जात असल्याने विशेष तंत्रज्ञानाचा वापर करुन या रेल्वे मार्गाचं काम करण्यात आलं आहे.

शिचुआन-तिबेट हा नवीन रेल्वे मार्ग शिचुआन प्रांताची राजधानी असणाऱ्या चेंगदुपासून याहयान-छामदो मार्गे तिबेटपर्यंत येतो. या रेल्वेमार्गामुळे चेंगदु आणि ल्हासा या दोन मुख्य शहरांमधील अंतर तब्बल ३५ तासांनी कमी होणार आहे. पूर्वी चेंगदु ते ल्हासा प्रवास करण्यासाठी ४८ तासांचा अवधी लागायचा आता हा वेळ केवळ १३ तासांवर आला आहे. नायींगशी म्हणजेच लिंझीपर्यंत हा रेल्वे मार्ग येतो. लिंझी हे शहर भारत-चीन सीमेजवळच असून तेथून काही अंतरावर भारताचे अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे.

मागील महिन्यामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रेल्वे आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना शिचुआन आणि लिंझीला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाचा वेग वाढवण्यासंदर्भातील निर्देश दिले होते. हा रेल्वे मार्ग देशाच्या सुरक्षेसाठी आणि भारत चीन सीमेवरील शांततेसाठी महत्वाचा ठरेल असं जिनपिंग म्हणाले होते. हा रेल्वे मार्ग तिबेट रेल्वे कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेडने बांधला आहे. या मार्गावर १६० किमी प्रती तास वेगाने रेल्वे गाड्या धावू शकतील असा दावा कंपनीने केला आहे. या ४३५ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर ४७ बोगदे आणि १२० पूल आहेत.

तिबेटची राजधानी ल्हासा आणि पूर्व तिबेटमधील लिंझीला जोडणाऱ्या या रेल्वे मार्गाचं काम २०१४ साली सुरु झालं होतं. या रेल्वे मार्गाचा ९० टक्क्यांहून अधिक भाग हा समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवर आहे.

Exit mobile version