Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारताला रशिया S -400 एअर डिफेन्स सिस्टिम देणार

मास्को : वृत्तसंस्था । S-400 एअर डिफेन्स सिस्टिम जलदगतीने सुपूर्द करण्यासंदर्भात भारताने कोणतीही विनंती केल्यास, आम्ही आमच्यापरीने लवकरात लवकर ती सिस्टिम देण्याचा प्रयत्न करु, असे रशियाच्या मुत्सद्दी अधिकाऱ्याने सांगितले.

पुढच्यावर्षी २०२१ च्या अखेरीस ही एअर डिफेन्स सिस्टिम भारताकडे सुपूर्द करण्याची योजना आहे. दोन्ही देश केए-२२६ या बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्सची खरेदीसंदर्भातील करार करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियान लक्षात घेऊनच हे करार करण्यात येतील, असे रशियाचे मुत्सद्दी अधिकारी रोमन बाबुशकीन म्हणाले.

भारताने रशियाबरोबर ५.४ अब्ज डॉलर्सचा पाच S-400 एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याचा करार केला आहे. भारत-चीनमध्ये लडाख सीमेवर असलेल्या तणावामुळे S-400 एअर डिफेन्स सिस्टिम लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे काही संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. या सिस्टिमसाठी भारताने मागच्यावर्षी पेमेंटचा एक हप्ता दिला आहे. एस-४०० ही जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे.

शत्रूचे कुठल्याही प्रकारचे हवाई हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम भारतासाठी हवाई सुरक्षा कवचाचे काम करेल. शत्रूची शक्तिशाली बॅलेस्टिक मिसाइल, फायटर विमाने हवेतच नष्ट करण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. रशियाने विकसित केलेल्या एस-४०० ट्रायम्फ मिसाइल सिस्टिमला नाटोने एसए-२१ ग्रोलर असे नाव दिले आहे.जमिनीवरुन हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची ही जगातील सर्वात धोकादायक मिसाइल सिस्टिम आहे. अमेरिकेने विकसित केलेल्या टर्मिनल हाय अ‍ॅल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टिमपेक्षा एस-४०० जास्त परिणामकारक आहे.

एस-४०० बहुउद्देशीय रडार, स्वयंचलित शोध यंत्रणा, विमान विरोधी क्षेपणास्त्र, लाँचर्स तसेच कमांड कंट्रोल सेंटरने सुसज्ज सिस्टिम आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम फक्त पाच मिनिटात तैनात करता येईल. तीन वेगवेळया प्रकारची मिसाइल डागण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे.

Exit mobile version