भारताला चीनकडून ऑक्सिजन नको

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  ऑक्सिजनसाठी चीन मदतीचा हात पुढे करत असतानाही भारत मदत घेण्यास तयार नसल्याचं दिसत आहे.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताच्या आरोग्य व्यवस्थेचं कंबरडं मोडलं  आहे. अनेक ठिकाणी अपुऱ्या वैद्यकीय  उपकरणांमुळे रुग्णांना जीव गमवावा लागतोय. अनेक रुग्णालयात प्राणवायूचा तुटवडा आहे. काही रुग्णालयांनी प्राणवायू संपल्याचे फलक देखील रुग्णालयाबाहेर लावले आहेत. त्यामुळे वाढते रुग्ण आणि अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. प्राणवायूची कमतरता जाणवत असल्याने भारताने आखाती देश आणि सिंगापूरकडे मदतीचा हात मागितला आहे.

 

“भारतात स्थिती गंभीर आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी प्रत्येकाने मदत करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय एकता आणि परस्पर मदतीची प्रत्येकाला गरज आहे. अशा स्थितीत एकमेकांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे. भारताला आम्ही सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहोत.”, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

 

 

भारताने गेल्यावर्षी चीनकडून वैद्यकीय उपकरणं मागवली होती. व्यावसायिक करार असल्याचं कारण पुढे करत ही उपकरणं मागण्यात आली होती. भारत आणि चीन दोन्ही देश दक्षिण आशियातील देशांना लसींचा पुरवठा करत आहे. त्यात श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशचा समावेश आहे. श्रीलंका आणि नेपाळनं भारताकडून लसींचा पुरवठा कमी झाल्यास चीनकडून मदत घेण्याचा विचार केला आहे. भारताकडून लसींचा पुरवठा कमी होत असल्याने आता चीन या देशांना लसींचा पुरवठा करण्यासाठी पुढे आला आहे. बांगलादेशनं ३० दशलक्ष लसींसाठी भारतासोबत करार केला आहे. मात्र भारताकडून जानेवारीपासून आतापर्यंत ७ दशलक्ष लसींचा पुरवठा बांगलादेशला करण्यात आला आहे. .

 

भारत चीन सीमेवर काही महिन्यांपासून तणावाचं वातावरण आहे. सीमेवरुन सैनिक मागे हटले तरी तणाव कायम आहे. एप्रिल २०२० मध्ये चिनी सैनिक भारताच्या नियंत्रणात असलेल्या भूभागात घुसले होते.

 

Protected Content