Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतात हिंदूंचं सर्वाधिक धर्मांतर

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात धर्मांतरावरुन सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असताना एका सर्व्हेमधून समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात सर्वात जास्त धर्मांतर होणाऱ्यांमध्ये हिंदू आहेत.

 

प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. धर्मांतराचा सर्वाधिक फायदा ख्रिश्चन समाजाला मिळत आहे. सर्व्हेमध्ये सहभागी ०.४ टक्के लोक आधी हिंदू होते. फक्त ०.१ टक्के लोक आधी ख्रिश्चन होते.

 

प्यू रिसर्च सेंटरच्या सर्व्हेनुसार, भारतात ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करणाऱ्यांपैकी ७४ टक्के लोक एकट्या दक्षिण भारतातील राज्यांमधील आहेत. हेच कारण आहे की, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ख्रिश्चन लोकसंख्येत थोडी वाढ झाली आहे. सर्व्हेत सहभागी सहा टक्के दक्षिण भारतीयांनी आपण जन्मापासून ख्रिश्चन असल्याचं सांगितलं. तर सात टक्के लोकांनी आपण सध्या ख्रिश्चन असल्याचं म्हटलं आहे.

धर्मांतर करणाऱ्यांमधील जवळपास अर्धे लोक हे अनुसूचित जातीमधील आहेत. हिंदू ज्यांना धर्मांतर करुन ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यांच्यातील जवळपास अर्धेजण अनुसूचित जातीतले आहेत. तर १४ टक्के अनुसूचित जमाती, २६ टक्के ओबीसीमधील आहेत.

 

हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांपैकी ४५ टक्के लोकांनी भारतात खासकरुन अनुसूचित जातीसोबत भेदभाव केला जात असून धर्मांतरण करण्याचं हेच कारण असल्याचं म्हटलं आहे.

 

प्यू रिसर्च सेंटरच्या सर्व्हेनुसार, धर्मांतरामुळे कोणत्याही धर्मातील समाजाच्या लोकसंख्येवर विशेष परिणाम झालेला नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास, सर्व्हेत सहभागी ८१.६ टक्के लोकांनी आपला जन्म हिंदू धर्मात झाल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे ८१.७ टक्के लोकांना आपण सध्याच्या घडीला हिंदू असल्याचं सांगितलं आहे.

 

 

याचप्रमाणे ११.२ टक्के लोकांनी आपला जन्म मुस्लीम धर्मात झाल्याचं सांगितलं असून तितक्याच लोकांना आपण सध्या मुस्लीम असल्याचं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे २.३ टक्के लोकांनी आपला जन्म ख्रिश्चन धर्मात झाला होता सांगितलं असून २.६ टक्के लोकांनी आपण सध्याच्या घडीला ख्रिश्चन असल्याची माहिती दिली आहे.

 

हा सर्व्हे नोव्हेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान करण्यात आला होता. या सर्व्हेत देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ३० हजार ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं. १७ भाषांमधील या नागरिकांसोबत समोरासमोर चर्चा करण्यात आली. त्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.

 

 

Exit mobile version