Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतात कोरोना उच्चाटन करणाऱ्या लसीची निर्मिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था / अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांप्रमाणे भारतानेही कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून ‘कोव्हॅक्सीन’ या स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. सध्या देशभरातील १२ वैद्यकीय संस्थांमध्ये कोव्हॅक्सीन लशीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत.
देशात एकाबाजूला दररोज रुग्णांची संख्या वाढत असताना या कोव्हॅक्सनी लशीचा प्राण्यांवरील चाचणीचा रिपोर्ट सकारात्मक आला आहे. जगणं मुश्किल झालेल्या या काळात कोव्हॅक्सीन लशीचा प्राण्यांवरील पहिल्या फेजच्या चाचणीचा रिपोर्ट खूपच उत्साहवर्धक आहे. कुठल्याही लशीच्या निर्मितीला काही वर्ष लागतात. पण सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत काही महिन्यात यशस्वी लस निर्मितीचे आव्हान वैद्यकीय क्षेत्रासमोर आहे.

नेहमीपेक्षा अत्यंत वेगाने जगभरात करोना विरोधात लस संशोधन सुरु आहे. लशीची मानवी चाचणी करण्याआधी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राण्यांवर चाचणी केली जाते. त्याला प्री-क्लिनिकल चाचणी म्हणतात. कोव्हॅक्सीन प्राण्यांवरील चाचणीत प्रभावी ठरली आहे. एकूण २० माकडांना प्रत्येकी पाच याप्रमाणे चार गटांमध्ये विभागण्यात आले होते. त्यांना लशीचे दोन डोस देण्यात आले. माकडांच्या एका गटाला प्लासीबो देण्यात आला. तीन अन्य गटांना तीन वेगवेगळया प्रकारचा लशीचा पहिला डोस दिला. त्यानंतर १४ दिवसांनी दुसरा डोस दिला. १४ दिवसांनी दुसरा डोस दिल्यानंतर सर्व माकडं व्हायसरच्या संपर्कात आली. त्यानंतरच्या अभ्यासात लशीमुळे माकडांचे व्हायरसपासून संरक्षण झाल्याचे समोर आले. माकडांच्या शरीरात व्हायरसचा खात्मा करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्या तसेच नाक, गळा आणि फुफ्फुसांमध्ये व्हायरसचा गुणाकार थांबला. लस दिलेल्या माकडांच्या हिस्टोपॅथोलॉजिकल तपासणीत न्यूमोनियाचे कुठलेही लक्षण आढळले नाही. लशीचे दोन डोस दिलेल्या प्राण्यांमध्ये कुठलेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत.

कोव्हॅक्सीन लस दिलेल्या प्राणांमध्ये करोना विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. हेच या चाचणीचे यश आहे. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही मृत व्हायरसपासून ही लस विकसित करण्यात आली आहे. व्हॅक्सीनचा प्राण्यांवरील चाचणीचा रिपोर्ट जाहीर करताना अभिमान वाटत असल्याचे भारत बायोटेकने टि्वटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version