Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतातील खाजगी रुग्णालयांना लस देण्यास फायझरचा नकार

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । बायोटेकच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या अमेरिकेतील फायजर ही लस भारतामध्ये केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

 

भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी भारतामध्ये २४ तासांमध्ये तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. भारतामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या भारतात निर्माण होणाऱ्या लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहिम तीन महिन्यांपासून सुरु करण्यात आली आहे. असं असतानाही दुसऱ्या लाटेत परिस्थिती चिंताजनक होत आहे. सरकारने आता इतर देशांमधून लसी विकत घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. अमेरिकेतील फायजर कंपनीने भारताला लस देण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांनी एक महत्वाची अट घातली आहे.

 

रशियन बनावटीच्या स्फुटनिक लसीच्या निर्मितीला परवानगी दिल्यानंतर आता भारताची नजर अमेरिकितील फायजर कंपनीच्या लसीकडे लागली आहे. आज फायजरने भारतामध्ये लस देण्यासंदर्भात भाष्य करत लस देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांनी भारतात देण्यात येणाऱ्या लसी या केवळ सरकारी पुरवठा साखळीच्या माध्यमातून दिल्या जातील असं स्पष्ट केलं आहे.

 

कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “बाधितांची वाढती संख्या पाहून फायजर लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राधान्याने सरकारी यंत्रणेला लस पुरवठा करणार आहे. केवळ सरकारी कंत्राटाद्वारेच कंपनी भारतामध्ये लसींचा पुरवठा करणार आहे.”

 

भारतामध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नियोजित दोन लसींसोबतच इतर पर्यायांचाही भारत सरकारकडून विचार केला जात असल्याच्या बातम्या समोर येत आहे. खासगी कंपन्यांना थेट परदेशी कंपन्यांकडून लस घेऊ देण्याची परवानगी देण्यासंदर्भातील विचार सुरु असल्याचे समजते. मात्र फायजरच्या लसीची किंमत ४० डॉलर म्हणजेच तीन हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. भारतामधील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींची किंमत ३०० रुपयांपर्यंत आहे

 

लसीकरणाच्या बाबतीत भारताने चीन आणि अमेरिकेला मागे टाकत पहिला क्रमांकांवर झेप घेतली आहे. मागील ९२ दिवसांमध्ये भारतात १२ कोटी २६ लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये इतकं लसीकरण करण्यासाठी ९७ तर चीनमध्ये १०८ दिवस लागले होते. उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील एक कोटींहून अधिक व्यक्तींना लस देण्यात आली आहे. दिवसाला सर्वाधिक लसी देणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलीय.

Exit mobile version