Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारताची कोरोना लसीकरण मोहीम जगात सर्वात मोठी — मोदी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याच्या दृष्टीने भारतात तयारी सुरु असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून लोकांना भारतात निर्मिती झालेल्या लसीचा डोस मिळेल असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये एम्स रुग्णालयाच्या भूमीपूजनावेळी ते बोलत होते.

“देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सध्या कमी होत चालली आहे. आम्ही जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याची तयारी करत आहोत,” असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. “२०२० ने आपल्याला आरोग्य हीच संपत्ती आहे हे चांगलंच शिकवलं आहे. हे वर्ष अनेक आव्हानं घेऊन आलं,” असंही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “भारत जागतिक आरोग्याचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आलं आहे. २०२१ मध्ये आपल्याला आरोग्य सेवेसाठी भारताची भूमिका बळकट करावी लागेल”.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवरही निशाणा साधला. “२०१४ मध्ये आपलं आरोग्य क्षेत्र वेगळ्याच दिशेला होतं. वेगवेगळ्या दृष्टीकोनातून काम केलं जात होतं. प्राथमिक आरोग्य केंद्राचाही वेगळीच प्रणाली होती. गावात योग्य सुविधा मिळत नव्हत्या,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

“भारताने योग्य वेळेत पाऊलं उचलल्याने आज आपण चांगल्या स्थितीत आहोत. १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात एक कोटी लोकांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

 

Exit mobile version