Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजप , चंद्रकांत पाटलांकडून क्षमा याचनेची काँग्रेसची मागणी

 

मुंबई : वृत्तसंस्था । उत्तराखंडमधील कावड यात्रा रद्द झाल्यावर आता  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यातील भाजप नेत्यांसह चंद्रकांत पाटलांनी लोकांची माफी मागावी असा दणका दिला आहे

 

“कावड यात्रा बंद करताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री जनतेच्या जीवाशी खेळ नको व देवालाही हे आवडणार नाही असे म्हणतात. आपल्या हीन राजकारणासाठी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांनी आणि चंद्रकांत पाटलांनी आता जनतेची माफी मागावी. कुठे गेले ते भाजपा अध्यात्मिक आघाडीचे थोतांड?” असं ट्वीट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.

 

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता धार्मिक उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी एकादशीची वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या निर्णयावरून भाजपाकडून टीका केली जात आहे. आता उत्तराखंडमधील कावड यात्रेवरून काँग्रेसनं राज्यातील भाजपा नेत्यांची कानउघाडणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजपा नेत्यांनी पंढरीच्या वारीवरून महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता उत्तराखंडमधील भाजपा मुख्यमंत्र्यांनी कावड यात्रेसंदर्भात दिलेल्या वक्तव्याची री ओढत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपा नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. या संदर्भात त्यांनी ट्विट करत राज्यातील भाजपा नेते आणि भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टॅग केलं आहे. तसेच जनतेची माफी मागा, असा इशारा दिला आहे.

 

वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदाही  आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. मोजक्याच दिंड्यांना परवानगी देण्यात आली आहे. या दिंड्या बसमधूनच पंढरपुरात दाखल होणार आहेत. मात्र, या निर्णयावर भाजपाकडून टीका करण्यात आली होती. “उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांवरच अभिषेक करा म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा,” असा टोला भाजपाने लगावला होता.

 

Exit mobile version