Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपसोबत गेलेले लवकरच संपले : शरद पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात विरोधी पक्षाला नेस्तनाबूद करण्याचे काम सुरू असून यामुळे थेट पक्ष फोडले जात आहेत. मात्र भाजपसोबत गेलेले सर्व पक्ष लवकरच संपले ! अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जोरदार टिकास्त्र सोडले.

 

आजचा दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी अतिशय महत्वाचा असा आहे. पक्षाची काका आणि पुतण्या अशा दोन गटांमध्ये उभी फूट पडली असून दोन्ही गटांतर्फे आपणच खरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असल्याचा दावा करण्यात येत आहे. यातच दोन्ही गटांच्या आज बैठका झाल्या. यात प्रारंभी अजित पवार यांनी आपल्या काकांवर घणाघाती टिका केली. शरद पवार यांनी या टिकेला आपल्या भाषणातून उत्तर दिले.

 

शरद पवार म्हणाले की, आजची बैठक ही एक ऐतिहासिक बैठक आहे. संपूर्ण देशाचं लक्ष आपल्या बैठकीकडे आहे. संपूर्ण देशात चर्चा आहे की २४ वर्षांपूर्वी तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जन्म झाला. षण्मुखानंदमध्ये बैठक झाली त्यानंतर शिवाजी पार्कवर लाखांची सभा झाली. पक्षाची स्थापना केल्यानंतर आज २४ वर्षे झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नेतृत्वाची फळी उभी करण्याचं यश राष्ट्रवादीला आलं. कुणी आमदार आले, कुणी खासदार आले कुणी नगरसेवक झाले. सामान्य कुटुंबातला कार्यकर्ताही राज्य चालवू शकतो हे राष्ट्रवादीने दाखवून दिलं.

 

शरद पवार पुढे म्हणाले की, आज काही लोकांनी भाषणं केली. बोलताना सांगत होते शरद पवार आमचे गुरु आहेत. आमच्या मित्रांचा मेळावा झाला त्यात फोटो पाहिले का? सगळ्यात मोठा फोटो होता माझा. मुंबईत पोस्टर लावली की फोटो माझा. त्यांना माहित आहे आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे चालणारं नाणं घेतलं पाहिजे. त्यांचं नाणं खरं नाही ते खणकन वाजणार नाही अडचण नको म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला बडवे जाऊ देत नाहीत असाही आरोप झाला. कसले बडवे? पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं असेल तर कुणी अडवत नाही. पांडुरंग म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणायचं ही गंमतीची गोष्ट आहे.

 

पवा म्हणाले की, आज देशामध्ये कमालीची अस्वस्थता जनतेत आहे. दुसर्‍या बाजूला आम्ही लोकांनी प्रयत्न सुरु केले की लोकशाही टिकवायची असेल तर संवाद सुरु करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आम्ही सत्ताधारी पक्षात जे नाहीत त्यांना बरोबर घेऊन चर्चा केली. १७ आणि १८ तारखेलाही आम्ही एकत्र येत आहोत. हे जसं घडायला लागलं तशी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. बरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी टीका केली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेत का घेतलं? याचा अर्थ असा आहे की हे सत्ताधारी वाट्टेल ते बोलतात आणि जनमानसात एक प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असंही शरद पवार यांनी म्हटलंं आहे. तर भाजपसोबत गेलेल्यांचे काय हाल होतात हे देशाने पाहिले असल्याचेही ते म्हणाले.

Exit mobile version