भाजपवर स्टंटबाजीचा अशोक चव्हाणांचा आरोप

मुंबई : वृत्तसंस्था । विधीमंडळात भाजपाने आज केलेल्या आंदोलनाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  म्हणाले की, लोकशाहीच्या नावाने भाजप कितीही गळे काढत असले तरी त्यात काहीही अर्थ नाही.लोकशाहीच्या नावाखाली ‘स्टंट’बाजी करून ते आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

चव्हाण पुढे म्हणाले, भाजपाच्या आमदारांनी आपल्याबाबत अशोभनीय शब्द वापरले, गैरवर्तणूक केली, हे स्वतः विधानसभा तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल सभागृहात प्रत्यक्ष सांगितले. त्यावेळी विरोधी पक्षनेतेही सभागृहात उपस्थित होते. परंतु, तेव्हा त्यांनी तालिकाध्यक्षांच्या विधानाच्या सत्यतेबाबत कोणताही आक्षेप नोंदवला नाही. याचाच अर्थ भास्कर जाधव बोलले ते खरे होते, असे ध्वनीत होते. परंतु, त्यानंतर असे काही घडलेच नाही, असा निरर्थक दावा सभागृहाबाहेर केला जातो आहे आणि त्याआधारे लोकशाहीचा खून झाला, असा कांगावा सुरू आहे.

अशोक चव्हाण यांनी भाजपाच्या विधानसभेतल्या वर्तनावर सडकून टीका केली आहे. ते म्हणतात, हा सारा बनाव महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येणार नाही, असे भारतीय जनता पक्षाला वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. केलेली चूक मान्य करणे, हेच खरे प्रायश्चित आहे. पण त्यासाठी नैतिकता असावी लागते, इच्छाशक्ती असावी लागते. ती भाजपकडे नाही म्हणून लोकशाहीच्या नावाखाली ‘स्टंट’बाजी करून ते आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार चुकीचा तसेच लोकशाहीच्या व विधीमंडळाच्या प्रतिष्ठेला तडा देणारा आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

रोहित पवार यांनीही भाजपावर स्टंट करत असल्याची टीका केली आहे. ते ट्विट करत म्हणतात, “सर्वोच्च सभागृहाकडं पाठ फिरवायची, सरकार व मा.अध्यक्षांनी विनंती करूनही कामकाजात भाग न घेता सभागृहाबाहेर गोंधळ घालून खोटेनाटे आरोप करायचे,यावरून भाजपाला फक्त राजकारण करायचं,हे सिद्ध होतं! OBC,मराठा आरक्षण व कृषी कायद्यांवर बोलायला भाजपाजवळ काहीही ठोस नसल्याने हा केवळ स्टंट सुरू आहे!,”

 

Protected Content