भाजपला ६९८ कोटी तर काँग्रेसला १२२ कोटींच्या राजकीय देणग्या

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । राजकीय देणगी घेण्यात भारतीय जनता पक्षाच्या पुढे दुसरा कोणताही पक्ष नाही. सन २०१८ ते २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाला ६९८ कोटी रुपयांची देणगी मिळाली, तर काँग्रेस पक्षाला केवळ १२२.५ कोटी रुपयांची देणगी मिळू शकली.

असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सने अहवालात ही माहिती दिली आहे. २०१८-१९ दरम्यान राजकीय पक्षांना देणगी देण्यात टाटा समूहाचा प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट सर्वात पुढे आहे. कॉर्पोरेट कंपन्यांकडून राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या वाढतच आहेत. सन २००४-१२ दरम्यान कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळालेल्या देणग्या पाहिल्यास सन २०१८-१९ मध्ये त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

टाटाच्या प्रोग्रेसिव्ह ट्रस्टने २०१८-१९ दरम्यान ४५५ कोटी १५ लाख रुपयांच्या देणग्या राजकीय पक्षांना दिल्या. कॉर्पोरेट देणगीदारांच्या यादीत टाटा सर्वात वरच्या स्थानी आहे.

२०१२-१३ पासून २०१८-१९ या कालावधीत भारतीय जनता पक्षाला कॉर्पोरेट कंपन्यांकडून सर्वात अधिक देणग्या मिळाल्या. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या देणग्यांमध्ये इतर स्त्रोतांकडून आलेला पैसा हा केवळ ४४ कोटी रुपये इतकाच आहे. २०१८-१९ मध्ये उर्वरित राष्ट्रीय पक्षांना (काँग्रेस, एनसीपी, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएम) मिळालेल्या देणग्यांची बेरीज केली असता त्या रकमेहून ७ पट अधिक रक्कम भारतीय जनता पक्षाला मिळाली आहे.

राजकीय पक्षांना २० हजार रुपयांहून अधिक देणग्यांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. यात दात्याचे नाव, पत्ता, PAN, पेमेंट टाइप आणि रकमेचा तपशील द्यावा लागतो. २७४ कॉर्पोरेट देणगीदारांकडून राजकीय पक्षांनी १३.३६४ कोटी रुपये पॅनविना आणि पत्त्याविनाच प्राप्त केले आहे.

Protected Content