Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संजय महाजन भाजपचे संभाव्य उमेदवार तर पी.सीआबांचे काय?

पिंप्री खुर्द ता.धरणगाव : संतोष पांडे

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात कुणाचे आव्हान कुणाला? या आशयचे वृत्त ‘लाइव्ह ट्रेंड्स’ने गुरुवारी प्रसिद्ध केले होते. या वार्तापत्रात भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून संजय महाजन उमेदवार असतील असे भाकीत वर्तविले होते. जळगाव ग्रामीण मतदार संघात हे वार्तापत्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. परंतु पी.सी. पाटील यांच्या समर्थकांच्या गोटात मात्र,चिंतेचे वातावरण पसरले. जर संजय महाजन विधानसभेचे उमेदवार असतील तर, पी.सी.आबांचे काय? अशी चर्चा या निमित्ताने रंगायला सुरुवात झाली. दरम्यान, ‘लाइव्ह ट्रेंड्स’च्या या वार्तापत्राने मतदार संघातील राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडालेली आहे.

सर्वत्र वातावरण पोषक असतांना देखील भाजपचे पी.सी.पाटील हे २०१४ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. तसेच आपल्या पारंपारिक जिल्हा परिषद गटमधून झालेला धक्कादायक पराभव पीसीआबांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक असल्याचा शिक्का देखील पी.सी. पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे ना.गिरीष महाजन गटापासून पीसी पाटील यांचे थोडे लांबचे अंतर आहे. तर संजय महाजन यांना ना.गिरीष महाजन अर्थात थेट मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. एकंदरीत या कारणांमुळे यंदा पी.सी.पाटील यांना उमेदवारी मिळेल किंवा नाही? या बाबतची शंका भाजपच्याच एका गटातून व्यक्त केली जातेय. तर दुसरीकडे भाजपकडून तालुकाध्यक्ष संजय महाजन किंवा जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवने यांना उमेदवारी मिळण्याचा अंदाज सध्या भाजपातूनच व्यक्त होतोय. धरणगाव सारख्या मोठ्या शहरातून उमेदवार दिल्यास भाजपला मोठे मताधिक्क्य मिळू शकते. तसेच नगरपालिकेत अवघ्या काही मतांमुळे पराभूत झाल्यामुळे संजय महाजन यांच्याबाद्द्दल सहानभूती आहे. परंतु अनेक वर्षापासून विधानसभेच्या प्रतीक्षेत असलेले पी.सी. पाटील इतक्या सहजरित्या माघार घेतील का? उमेदवारी न मिळाल्यास पी.सी.आबा बंडखोरी करतील का? बंडखोरी न केल्यास पी.सी.आबा व त्यांचे समर्थक पक्षाच्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करतील का? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उभा राहतोय.दुसरीकडे विधानसभेत उमेदवारी न मिळाल्यास पी.सी.पाटील किंवा संजय महाजन यांचे राजकीय पुर्नवसन कसे करायचे? हे मोठे संकट भाजपा पक्षश्रेष्ठीवर राहणार आहे. एकंदरीत भाजपच्या गोटात लोकसभेआधीच विधानसभेच्या उमेदवारीवरून सुप्त चढाओढ सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version