Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाईंदरमध्ये मध्यरात्री भीषण स्फोट : सुदैवाने जीवितहानी नाही

bhishan sfot

मुंबई, वृत्तसंस्था | महानगराच्या भाईंदर पश्चिम परिसरातील ‘मॅक्सस मॉल’ समोरील ‘इटालीयोज हॉटेल’मध्ये रात्री १२.३० च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटची तीव्रता इतकी होती की, परिसरातील अनेक घरांच्या खिडकीच्या काचा फुटून नुकसान झाले. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी मात्र झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय, पण अद्याप स्फोटाचे मुख्य कारण स्पष्ट झाले नसल्यामुळे बॉम्ब शोधक पथकाला पुढील तपासकार्य सोपवण्यात आले आहे.

 

भाईंदर पश्विम परिसरात ‘मॅक्सेस मॉल’ समोरील भागात नव्याने सुरु झालेले ‘इटालीयोज हॉटेल’ आहे. रात्री गॅस गळतीमुळे मोठया प्रमाणात उष्ण वायूच्या दाबाचा पट्टा निर्माण होऊन रात्री १२.३० च्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, जवळील इमारतींच्या घरातील काचा फुटून नुकसान झाले. तसेच फेरफटका मारण्यास निघालेल्या नागरिकांना काचा लागल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमनदलाचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली. हॉटेलमध्ये धूर जाण्यासाठी आवश्यक असलेली चिमणीच नसल्यामुळे स्फोट झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रचंड रहदारी असलेल्या या भागात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्यामुळे जीवितहानी झाली नसली तरी, अशी घटना या परिसरात पुन्हा होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. शहरातील सर्व हॉटेलची तपासणी करून आवश्यक त्या गोष्टी हॉटेल मालकांकडे आहेत का नाही यांची आयुक्तांनी दखल घेण्याची मागणी माजी विरोधीपक्ष नेते असिफ पटेल यांनी केली आहे.

Exit mobile version