Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; दुसरा गंभीर जखमी

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या बापलेकाच्या दुचाकी भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने बापाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना एरंडोल म्हसावद रस्त्यावर घडली आहे. डंपर चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. श्रावण दगा पाटील (वय-६७) रा.कल्याणे खुर्द ता.धरणगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथील श्रावण दगा पाटील (वय-६७) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथे नातेवाईकांकडून गंधमुक्तीचा कार्यक्रमाला श्रावण पाटील हे मुलगा अमोल श्रावण पाटील यांच्यासोबत सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी दुचाकी (एमएच १९ एझेड ११२१) ने गेले. एरंडोल ते म्हसावद रस्त्यावरील निखिल पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणारा डंपर (एमएच १५ एफव्ही ७७०७) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात श्रावण पाटील हे रोडावर पडल्याने त्यांच्या अंगावरून डंपर गेले. यातच त्यांचा जागीच अंत झाला. तर अमोल पाटील हा बाजूला फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमी झालेल्या अमोलला तातडीने एरंडोल रूग्णालयात हलविण्यात आले. तर डंपर चालक हा डंपर घेवून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version