Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रिटनसाठी उड्डाणं पुन्हा सुरू होणार

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोविडच्या नव्या स्ट्रेनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं ब्रिटनशी संबंधित उड्डाण सेवा काही काळ स्थगित केली होती. ८ जानेवारीपासून या उड्डाण सेवेला पुन्हा एकदा सुरूवात होणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर जारी करण्यात आलीय. केंद्रानं जाहीर केलेल्या नियमावलीप्रमाणे ८ जानेवारी ते ३० जानेवारी या काळात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हे नियम लागू केले जाणार आहेत. यानुसार, नागरी उड्डाण संचालनालयाकडून या नियमांचं कठोरपणे पालन केलं जाणार आहे.

कोणत्याही प्रवाशाला ब्रिटन आणि भारत यांदरम्यान कोणत्याही तिसऱ्या देशाचा प्रवास करता येणार नाही. याचाच अर्थ ब्रिटनहून भारतात येणाऱ्या प्रवाशाला कोणत्याही तिसऱ्या देशाचा प्रवास करता येणार नाही.

नियमावलीप्रमाणे, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आपल्या गेल्या १४ दिवसांची ‘ट्रॅव्हल हिस्ट्री’ अर्थात भेट दिलेल्या ठिकाणांची माहिती प्रशासनाला द्यावी लागणार आहे. तसंच प्रवासापूर्वी ७२ तास अगोदर ‘सेल्फ डिक्लरेशनन फॉर्म’ही भरावा लागेल.

ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना प्रवासापूर्वी ७२ तासांपर्यंत करण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगावा लागेल. हा रिपोर्ट ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावा लागेल.

विमान विमानतळावर उतरण्यापूर्वी प्रवाशांजवळ निगेटिव्ह आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट असल्याची खातरजमा विमान कंपन्यांना करावी लागणार आहे. विमानतळावर होणाऱ्या आरटी पीसीआर चाचणीचा खर्चही प्रवाशांना करावा लागणार आहे. आरटी पीसीआर चाचणी केल्यानंतर प्रवाशांच्या आयसोलेशन / वेटिंगसाठी व्यवस्था करण्याची जबाबदारी विमानतळ व्यवस्थापनाची असेल.

Exit mobile version