Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरण

 

लंडन: वृत्तसंस्था । उत्तर-पूर्व इंग्लंडमध्ये वास्तव्य करणारे भारतीय वंशाचे हरी शुक्ला यांनादेखील कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना ब्रिटनमध्ये मंगळवारपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन आहे. पहिल्यांदाच लस घेणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये एका ८७ वर्षीय भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे.

शुक्ला यांना न्यूकॅसल येथील एका रुग्णालयात फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात येणार आहे. लस टोचून घेणे हे आपले कर्तव्य असल्याची प्रतिक्रिया शुक्ला यांनी व्यक्त केली. जागतिक महासाथीचा आजार असलेल्या कोरोनाच्या शेवटाकडे आपण जात असून लस घेऊन मी आपली जबाबदारी पूर्ण करत असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील मंगळवारचा दिवस ब्रिटनसाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. मंगळवारी ब्रिटनमध्ये ‘व्ही-डे’ अर्थात वॅक्सिन-डे असणार आहे.

ब्रिटनने फायजरने विकसित केलेल्या लशीला मंजुरी देत सर्वांसाठी लस उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. सर्व चाचण्या पार पाडल्यानंतर आवश्यक त्या मंजुरी मिळवून लसीकरण मोहीम सुरू करणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. फायजरने ही लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत लस ९५ टक्के प्रभावी आढळली होती.

वयस्कर नागरिकांसाठी ही लस फायदेशीर ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. चाचणीत वयस्करांमध्ये ही लस ९४ टक्के यशस्वी झाली होती. ब्रिटनमध्ये ही लस घेणे सक्तीचे नसून ऐच्छिक असणार आहे. ब्रिटनमधील इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आर्यंलडमध्ये लस देण्यास सुरुवात होणार आहे.

ब्रिटनमधील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केअर होममध्ये राहणारे वयस्कर मंडळी, आरोग्य कर्मचारी, आरोग्य स्वयंसेवक आदींना लस देण्यात येणार आहे. त्याशिवाय ८० वर्ष व त्याहून अधिक वय, त्यानंतर ७५ वर्ष व त्याहून वय, ६५ वर्ष व त्याहून अधिक वय, ६० व त्याहून अधिक वय असलेल्या वयोगटातील व्यक्तिंना या प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. त्याशिवाय १६ ते ६४ या वयोगटात ज्यांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असेल त्यांनाही लस देण्यात येणार आहे.

Exit mobile version