Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारत विजयी

मेलबर्न– टीम इंडियानं बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट राखून बाजी मारली आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. अजिंक्यचे शतक अन् रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीला अन्य गोलंदाजांनी खांद्याला खांदा लावून केलेल्या खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना जिंकला.

कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर विराट कोहली, शमी यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने आश्वासक मारा करत धडाकेबाज विजयाची नोंद केली आहे.

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन संघाने ६ बाद १३३ पर्यंत मजल मारत दोन धावांची आघाडी मिळवली होती. कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या सत्रात चांगलंच झुंजवलं. अखेरीस कमिन्सला बाद करत बुमराहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर कॅमरुन ग्रीनही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४५ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ३, बुमराह-आश्विन आणि जाडेजा या अनुभवी त्रिकुटाने प्रत्येकी २-२ तर उमेश यादवने १ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल दुसऱ्या डावातही अवघ्या ५ धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या चेतेश्वर पुजारालाही आपली छाप पाडता आली नाही. ३ धावा काढून पुजारा कमिन्सच्या गोलंदजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेने दडपण कमी केलं. यानंतर शुबमन गिलनेही काही चांगली फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप आणलं. अखेरीस रहाणे-गिल जोडीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Exit mobile version