Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बैठकीतील अपमानाने आंदोलक शेतकरी संतापले ; चर्चा निष्फळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नव्या कृषी कायद्यासंबंधी केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये पार पडलेली चर्चेची ११ वी फेरीदेखील निष्फळ ठरली आहे. शेतकरी नेत्यांनी यावेळी आपण प्रजासत्ताक दिनी ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

बैठक संपल्यानंतर शेतकरी नेत्यांनी ज्यापद्धतीने आपल्याला वागणूक देण्यात आली त्यातून अपमान झाल्याचं सांगत संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना प्रस्तावावर उद्यापर्यंत निर्णय घेण्यास सांगितलं असल्याची माहिती दिली

“मंत्र्यांनी आम्हाला साडे तीन तास वाट पहायला लावली. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. जेव्हा ते आले तेव्हा आम्हाला सरकारच्या प्रस्तावावर विचार करण्यास सांगितलं. आता बैठकांची प्रक्रिया संपवत असल्याचंही म्हणाले,” अशी माहिती किसान मजदूर संघर्ष समितीचे श्रवण सिंह पंढेर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचा आंदोलन शांततेच्या मार्गाने यापुढेही सुरु राहील असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी प्रजासत्ताक दिनी ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं आहे. बैठकीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “सरकारने आमच्यासमोर नव्या कृषी कायद्यांना दोन वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच हा प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी असेल तरच चर्चेची पुढील फेरी होईल असंही म्हणाले आहेत”. शेतकरी संघटनांनी आधीच सरकारचा प्रस्ताव नाकारला आहे.

“संघटना शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा करत नसल्याने चर्चा निष्फळ ठरली आहे. याबद्दल मला दुख: आहे. सरकार पर्याय देत असतानाही शेतकरी संघटनां फक्त कृषी कायदे रद्द करा अशीच मागणी करत आहेत. आम्ही त्यांनी शेतकरी आणि देशहितासाठी प्रस्तावावर फेरविचार करण्यास सांगितलं आहे. उद्यापर्यंत निर्णय कळवण्यास आम्ही सांगितलं आहे,” अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. काहींना हे आंदोलन असंच सुरु राहावं आणि यामधून तोडगा निघू नये असं वाटत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

Exit mobile version