Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न

 

जळगाव, प्रतिनिधी  । ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानातंर्गत जिल्ह्यात गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिल्यात.

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृति दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त श्री. य. कों. बेंडकुळे, विधी प्राधिकरणाचे सचिव श्री. ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामविकास) बी. ए. बोटे, (महिला व बालविकास) श्री. तडवी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मुलींची संख्या वाढण्यासाठी प्रशासनातर्फे नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखाव्यात. मुलींना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी विशेषत: आदिवासी भागातील किशोरवयीन मुलींची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करुन त्यांच्यातील हिमोग्लोबीन तपासावे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. महिलांची छळवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अशा तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी. वन स्टॉप सेंटरमार्फत महिलांचे समुपदेशन करावे, त्याचबरोबर जिल्ह्यातील महिलांना व मुलींना एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना, माझी कन्या भाग्यश्री, अस्मिता योजना, मनोधैर्य योजना, सुकन्या समृध्दी योजना, मातृत्व वंदन योजनांचा लाभाबरोबरच इतर योजनांचाही लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून यासाठी तालुका कृती दलाच्या बैठका घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.

जिल्ह्यात नोंदणीकृत 334 सोनोग्राफी सेंटर असून 154 केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी बैठकीत सांगितले.

पिडीत महिलांच्या अडचण सोडविण्यासाठी त्यांनी 181 या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार सध्या देशात मुलींचा जन्मदर दर हजारी 914 तर राज्याचा दर 894 इतका आहे. तर जळगाव जिल्ह्यात मुलींचे गुणोत्तर 920 इतके आहे. सध्या हे प्रमाण वाढले असून यात अजून वाढ होण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यासाठी कृति आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. परदेशी यांनी बैठकीत सांगितले.

Exit mobile version