Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बी. जी. कोळसे पाटील यांच्या भाषणाला फर्ग्युसनमध्ये नाकारली परवानगी !

पुणे प्रतिनिधी । माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या भाषणाला आज फर्ग्युसन कॉलेजमध्ये परवानगी नाकारल्याने तणावाचे वातावरण निर्मित झाले. दरम्यान, कोळसे पाटील यांनी यावरून कॉलेजच्या आवारात भाषण करून सरकारवर हल्लाबोल केला.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवाजागर व्याख्यानमाले अंतर्गत बी. जी. कोळसे पाटील यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. यानुसार आज दुपारी १२ ते ३ या वेळेत महाविद्यालयातील अ‍ॅम्फी थिएटरमध्ये हे व्याख्यान होणार होते. पण, ऐनवेळी प्रशासनाने व्याख्यानाला परवानगी नाकारली. त्यामुळे महाविद्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या एका गटाने कोळसे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर दुसर्‍या गटाने याला जोरदार प्रत्युत्तर दिले. यामुळे त्यांनी अखेर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरातच व्याख्यान दिले.

बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, की टिळकांना अभिवादन करून मी भारतीय संविधानावर बोलण्यासाठी आलो होते. दबंगशाही करून चालणार नाही, वैचारिक उत्तर द्यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकावर मी बोलणार आहे. बाबासाहेबांनी मुलभूत हक्कांबाबत लिहिले आहे. गरिब आणि श्रीमंतांमध्ये दरी नाही पाहिजे. आपले सगळे कर्तृत्व, दातृत्व जातीत सुरु होते आणि जातीतच संपते अशी टीका त्यांनी केली. भाषणे करायला परवानगी रद्द करणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. बहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात. आयबीचा अधिकारी हा संघाच्या प्रमुखचा भाऊ असतो. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो, असा आरोपही त्यांनी केला.

Exit mobile version