Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिरादरीवादाला फाटा देत दोन घटस्फोटितांचा “निकाह”

 

 

जळगाव, प्रतिनिधी | येथील मनियार वाड्यातील घटस्फोटिता नजमाबी शेख हुसेन व सुरत येथील घटस्फोटित अन्वरखान हसनखान पठाण या दोघांचा निकाह (विवाह) रविवारी जळगाव येथील जामा मशिदीमध्ये मान्यवरांनी लावला . बिरादरीवादाला फाटा देणाऱ्या या निकाहासाठी मौलाना रेहान बागवान यांनी विधिवत धार्मिक संस्कार पूर्ण केले

या विवाहप्रसंगी नजमाबीकडून वकिलाची भूमिका मनियार बिरादरीचे शहराध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर यांनी तर अन्वर खान यांच्यातर्फे साक्षीदार म्हणून जळगावच्या सुप्रीम कॉलनीमधील कुर्बान नथु पटेल व शकील पटेल यांनी पार पाडली . मौलाना रेहान बागवान यांच्या दुवापठणाने हा विवाह सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

मुस्लिम समाजातील व्यक्तीने इस्लामविरोधी कृत्य केले व पत्नीस तलाक दिला म्हणून पत्नीने पतीविरुद्ध शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अशी बातमी रविवारी सर्व वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली होती . त्याचवेळी ही सकारात्मक बातमी समाजाला दिशा देणारी ठरली आहे असे कौतुक या विवाहांचे मान्यवरांनी केले आहे .

सुरतचे अन्वरखान हसनखान पठाण हे खान बिरदारीचे. त्यांची बहिण पटेल बिरादरीची म्हणजे जळगाव येथे शकील रउफ पटेल यांच्याकडे संसार करत आहे अनवर खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर ते जळगाव येथे चालक म्हणून नोकरी करीत आहे.

जळगाव पिंप्राळा हुडकोतील सोयरिकी जमवून आणणारे अयाज शेख यांच्या निदर्शनास नजमाबीचे वडील शेख हुसेन यांनी पुनर्विवाहसाठी मुलगा असल्यास सांगावे असा प्रस्ताव दिल्याने पठाण बिरादरीचे वर , मनियार बिरादरीची वधू व पटेल बिरदारीची सासरवाडी यांच्यात कोणत्याही प्रकारे बिरादरीवाद न येता हा विवाह सोहळा पार पडला.

या छोटेखानी आदर्श विवाहसमारंभाला मनियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, पटेल बिरादरीचे रहीम पटेल, शकील पटेल, कुरबान नथू पटेल, ताहेर शेख, सलीम मोहम्मद, अब्दुल रऊफ, अल्ताफ शेख, सादिक शेख ,डॉ ताहेर शेख, अय्युब फकीरा ,जावेद चंनीवाले, शेख गुलाम मिस्तरी तर सिकलंगार बिरादरीचे समशेर खान यांची उपस्थिती होती.

निकाह लागताच नववधू नजमाबी हिला मानियारवाड्यातून बिदाइ देऊन सुप्रीम कॉलनी येथे रवाना करण्यात आले. कोणत्याही जेवणावळी आणि मानपान व बडेजावाशिवाय हा आदर्श निकाह संपन्न झाला !

Exit mobile version