बिबट्याच्या हल्यात दोन वासरे ठार 

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील मुंदखेडा बु. येथे बिबट्याने दोन वासरांचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सध्या संपूर्ण गावच दहशतीखाली वावरत आहे. त्यामुळे प्राण्यांसह ग्रामस्थांच्या जीवास अधिक धोका वाढल्याने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील मुंदखेडा बुद्रुक येथील शेतकरी निंबा नामदेव पाटील यांची भवानी शिवाराच्या बाजूला स्वतःच्या मालकीची जमीन आहे. त्याठिकाणी पाटील यांनी गुरेढोरे बांधण्यासाठी झोपडा बनविलेला आहे. दरम्यान निंबा पाटील हा नेहमीप्रमाणे रविवार रोजी सायंकाळी गुरांना चारापाणी करून घरी निघून गेला.

मात्र सकाळी शेतात आला असता त्याला बिबट्याच्या हल्यात १३ हजार रुपये किमतीचा एक गोऱ्हा ठार झाल्याचा दिसून आला. तेव्हा त्यांनी सदर घटनेबाबत वनविभागाला कळविले असून पंचनामा अजून बाकी आहे. दरम्यान याआधी सहा दिवसांपूर्वीच येथील गोकुळ शिवाजी पाटील या शेतकऱ्याचा वाकडी शिवरालगत असलेल्या शेतात बिबट्याने भ्याड हल्ला करून गोऱ्हाचाच बळी घेतल्याचा प्रकार घडला होता.

याबाबत त्यांनी वनविभागाला कळविल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामे केले होते. परंतु पाच दिवस होत नाही. तेवढ्यात दुसरी घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राण्यांसह नागरिकांच्या जीवास अधिक धोका वाढला आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Protected Content