Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिनशेती प्लॉट क्षेत्राच्या तुकडे खरेदीस मान्यतेसाठी एकनाथ खडसे यांचा पाठपुरावा

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बिनशेती प्लॉट क्षेत्राच्या तुकडे खरेदीस मान्यता देण्यासाठी माजी महसूल मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून नागरिकांना येणाऱ्या समस्या अवगत केल्याने लवकरच याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेऊन तसे निर्देश देईल असे आश्वासन दिल्याने दिलासा मिळालेला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिनशेती प्लॉट क्षेत्राच्या तुकडे खरेदी झाल्यानंतर प्लॉटधारकास नजराणा रक्कम भरून व विभागाच्या प्रांताधिकारी यांची परवानगी घेतल्याशिवाय तलाठी व मंडळ अधिकारी 7/12 उताऱ्यावर नावे लावत नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी यावल, फैजपूर व सावदा परिसरातील नागरिकांनी केलेल्या होत्या. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 270 चौ फूट प्लॉट असणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे. त्यासाठी बिनशेती प्लॉट क्षेत्रातील तुकडा खरेदी करून लाभार्थी ऐपतीनुसार प्लॉट दुय्यम निबंधक यांचेकडून खरेदी करून घेतलेले आहेत. मात्र सदर तुकडे खरेदी झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी नजराणा रक्कम भरण्याचा आग्रह धरत असून प्रांताधिकारी यांची परवानगी घेतल्याशिवाय नावे लावणार नाहीत अशी भूमिका घेत आहेत.

याबाबत यापूर्वी देखील फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांना निवेदन देण्यात आले होते मात्र शासनाचेच तुकडा बंदी खरेदीबाबत जुलै 2021 चे परिपत्रक असल्याने नजराना भरून परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. या सर्व बाबी लक्षात घेता यावल तालुक्या दौऱ्यावर आलेले माजी महसूल मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कानावर येथील नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील व माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, सावदा येथील पंकज येवले यांनी हा विषय यावल येथे भेटीला आले असता चर्चेला आला . यावेळी हा मांडला असता माजी मंत्री खडसे यांनी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याशी याबाबत भ्रमणध्वनीवरून सविस्तर चर्चा केली व नागरिकांना येणाऱ्या समस्येबाबत माहिती दिली असता लवकरच याबाबत सरकारी पातळीवर दखल घेण्यात येऊन तुकडे खरेदीस मान्यता देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असून संबंधितांना तशा सूचना देण्यात येतील अशी ग्वाही दिलेली आहे. बिनशेती पोट क्षेत्राच्या तुकडे खरेदीस मान्यता मिळाल्यास महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना प्लॉट खरेदी करणे सुलभ होणार असून त्यामुळे दिलासा मिळणार आहे याबाबत लवकर निर्णय होण्यासाठी उत्सुकता लागून आहे.

Exit mobile version