Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिगर-मराठा नेत्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा?

मुंबई : वृत्तसंस्था । काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचे खांदेपालट होण्याची चर्चा जोर धरत आहे. बाळासाहेब थोरात यांच्या जागी बिगर मराठा नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

थोरात पायउतार होणार का, त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील या अनुषंगाने काँग्रेस नेते आणि मंत्र्यांशी चर्चा करत आहेत. बिगर मराठा नेत्यांमध्ये राज्यसभा खासदार राजीव सातव, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या नावाची चर्चा आहे.

काँग्रेस प्रभारी महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नेतृत्व बदलाबाबत चर्चा झाली नाही. राज्यातील प्रश्न काय आहेत, यावर चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा झाली. आमदारांना निधी मिळत नाही, याबाबत मतं जाणून घेतली. प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत काही चर्चा झाली नाही, याबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा या प्रमुख नेत्यांसोबत मुंबईत मंगळवारी रात्री उशीरापर्यंत बराच वेळ चर्चा केली. तत्पूर्वी त्यांनी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या तीन माजी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली होती.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या असल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचा भार कमी करण्यात यावा, अशी इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी तरुण नेत्याला संधी द्यावी. आम्ही त्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते.

प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव यांची नावे चर्चेत होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version