Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाळ बोठे याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

 

 

 

अहमदनगर : वृत्तसंस्था । यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

बाळ बोठेला शनिवारी  हैदराबादवरुन अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बाळ बोठेच्या खिशात एक सुसाईड नोट सापडल्याचा खुलासा अहमदनगर पोलिसांनी केला आहे.

 

बाळ बोठेला पकडण्यासाठई पोलिसांनी हैदराबादेत 5 दिवसांचं सर्च ऑपरेशन राबवलं. त्यासाठी पोलिसांनी एकूण 6 पथकं बनवली होती. या काळात बाळ बोठे 3 वेळा पोलिसांना गुंगारा देत पसार झाला होता. आरोपीने आपल्या फोन रात्री बंद केला होता. पोलिसांनी हैदराबादेतील 5 हॉटेलमध्ये त्याचा शोध घेतला. पण अखेर तो 6 व्या हॉटेलमध्ये लपून बसल्याचं पोलिसांना आढळून आलं.

 

दरम्यान, बाळ बोठेच्या खिशात एक सुसाईड नोट सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यात आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख आहे. त्याच बरोबर माझा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर कुणाला संपर्क करावा, याची माहिती त्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

पोलिस अधीक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी पाच विशेष पथके स्थापन केली. हैदाराबादमध्ये बाळ बोठे जिथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्या भागात ही पथकं पाठवण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकले. त्यामध्ये तिघे हाती लागले. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आणि बोठेही पोलिसांच्या हाती लागला.

 

हैदराबादमधील एका हॉटेलमधून बाळ बोठेला अटक केली. इतकंच नाही तर बाळ बोठेला मदत करणाऱ्या इतर पाच जणांनाही पोलिसांनी जेरबंद केलं. विशेष म्हणजे ज्या रुममध्ये बाळ बोठे होता, त्या रुमला बाहेरुन कुलूप लावण्यात आलं होतं. अटकेसाठी पोलिसांनी 5 दिवस विशेष ऑपरेशन केलं. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत कौतुक होत आहे.

 

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेला रेखा जरे यांच मुलगा रुणाल जरे याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने पाच आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला होता.

Exit mobile version