बाळ आदलाबदली प्रकरणी पालकांचे जबाब नोंदविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुती विभागात बाळ आदलाबदली झाल्याचा प्रकार मंगळवारी २ मे रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आला होता. याप्रकरणी रुग्णालयाने चार वैद्यकीय अधिकार्‍यांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीने बाळाच्या पालकांच जबाब नोंदविले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली.

 

अधिक माहिती अशी की, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी  दोन महिलांची सिझर प्रसूतीनंतर पालकांना निरोप देतांना झालेल्या गैरसमजातून दोन नवजात शिशुंची अदलाबदल झाल्याची घटना मंगळवारी २ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली होती. या प्रकारानंतर बाळाच्या पालकांनी रुग्णालयात डॉक्टरांसह कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणाचा आरोप करीत गोंधळ घातला होता. यावेळी रुग्णालय प्रशासनाने दोन्ही बाळांना ताब्यात घेवून अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. डीएनए चाचणी करुन खरे पालक कोण? याची खात्री केली जाणार आहे.

 

याप्रकरणी विभाग प्रमुख डॉ. सत्यवान मोरे यांच्या अध्यक्षतेखाली चार वैद्यकीय अधिकार्‍यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीने आज बुधवारी ३ मे रोजी सकाळी बैठक घेतली. तसेच त्यावेळी प्रसुती विभागातील पूर्ण स्टॉफसह नवजात शिशुंच्या पालकांचे देखील जबाब नोंदविण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी बुधवारी ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता दिली.

Protected Content