Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बारावीच्या परीक्षार्थ्यांचे लसीकरण करा ; देवेंद्र मराठे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

 

 

जळगाव : प्रतिनिधी ।  राज्यातील बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे  प्रवेशपत्र आधी देऊन प्रवेशपत्राच्या आधारावर त्यांना  कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्याची मागणी  एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे केली आहे

 

महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या आगामी काही महिन्यांमध्ये होणार आहेत.

 

महाराष्ट्र राज्यामध्ये बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे पंधरा लाख विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेदरम्यान  या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोणाची बाधा होणार नाही, यासंबंधीची काळजी कशी घेता येईल..? याबद्दल आज एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दूरध्वनीवरून  आरोग्य मंत्री  राजेश  टोपे यांच्याशी चर्चा केली.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे वय अठरा वर्षे पूर्ण झालेले नसते. 18 वर्ष पूर्ण वयाच्या नियमांमध्ये  महाराष्ट्र सरकारने शिथीलता आणल्यास  व  बारावीच्या परीक्षार्थ्यांचे प्रवेश पत्र  परीक्षेच्या दीड महिना आधी  दिले तर प्रवेश पत्रकाच्या आधारावर  या विद्यार्थ्यांचे तात्काळ दोन्ही डोस देऊन लसीकरण करता येईल. या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाचा कुठलाही धोका राहणार नाही.

 

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एकवेळेस व बारावीची बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी लागणारी प्रवेश परीक्षा देण्याकरता परत एक वेळेस परीक्षा केंद्रावरती जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे.

त्यामुळे दोन वेळेस आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागत असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आपल्या पाल्याचा जीव कसा वाचवावा..? याबाबत चिंता पालकांमध्ये आहे.

वयाची शिथिलता आणून बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे या मागणीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देवेंद्र मराठे यांना “मला आपण पत्र द्यावे  मी लगेच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेतो व पुढील प्रक्रिया सुरू करतो याबाबतचे आश्वासन दिले.

Exit mobile version