Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटी

 

मुंबई : वृत्तसंस्था । कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना आज राज्याच्या अर्थसंकल्पात  घोषित करण्यात आली.

  महाविकास आघाडी सरकाच्या काळातील दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोरोना सारख्या अडचणीच्या काळात शेतीक्षेत्रानं सावरल्याचं सभागृहात सांगितलं. अर्थमंत्र्यांनी शेतीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय भाषणात विविध योजनांविषयी माहिती दिली.

3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा येईल, असं अजित पवार म्हणाले.

विकेल ते पिकेल अभियानासाठी शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजित किंमतीचा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प सुरु करण्यात येईल.

प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे राज्यात सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार असल्याची घोषणा करण्यात आली.

राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3 वर्षात 600 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. शरद पवार ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींगकरता अनुदान देण्यात येईल.कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागास 3 हजार 274 कोटी रुपये तरतूद करण्यात आलीय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेती क्षेत्राविषयी भाष्य करताना दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या केंद्र सरकारविरोधी आंदोलनाला राज्याचा पाठिंबा असल्याचं जाहीर केले.

Exit mobile version