Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाजार समितीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी

कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापार्‍यांनी संगनमत करून शेतकर्‍यांची लुट सुरू केली असून या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी येथील सरपंचांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील बाजार समितीतील व्यापारी लिलावात भाग घेत नसून संगनमताने शेतकर्‍यांची लूट सुरु आहे. यामुळे बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे,अशी मागणी कासोदा ग्रामपंचायतच्या सरपंचांनी केली आहे. येथील बाजार समितीत
बाजार भावापेक्षा ३००/ ४०० रुपये कमीने खरेदी केली जाते,७/८ व्यापार्‍यांना परवाना असतांना प्रत्यक्षात दोनच व्यापारी आहेत. माल खरेदी केल्यानंतर पेमेंट साठी ८ दिवस सांगितले जाते. मात्र २०/२५ दिवसात पेमेंट दिले जाते, कट्टी लावली जाते, हमाली,मापाडीचे मनमानी पणे पैसे कापले जातात, शेतकर्‍यांशी जोरात ओरडून हुज्जत घालतात व जा कोठे तक्रार करायची तेथे करा, अशी धमकी भरतात. काटा पासिंग कुणाकडेच नसून समितीच्या काट्यावर मोजमापाचे १०० रुपये वेगळे घेतले जातात, अशा आशयाची लेखी निवेदनासह तक्रार सरपंच मंगला राक्षे यांनी धरणगाव बाजार समितीकडे केली आहे.

Exit mobile version