Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बांगलादेशातील जशोरेश्वरी देवीकडे मोदींची जगाच्या कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना !!

 

ढाका : वृत्तसंस्था । बांगलादेश दौऱ्यात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ५१ शक्तिपीठांपैकी एक इश्वरीपूर येथील प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिराला भेट दिली. मोदींच्या हस्ते देवीची पुजा करण्यात आली.  मोदींनी आपण देवीकडे संपूर्ण मानवजातीला कोरोनापासून मुक्ती द्यावी अशी प्रार्थना केल्याचं सांगितलं.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. काल बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर आज मोदींनी जाशोरेश्वरी मंदिराला भेट दिली.  “बांगलादेशमध्ये मी जेव्हा २०१५ मध्ये आलो तेव्हा माँ भाग्यश्वरीच्या चरणांमध्ये लीन होण्याचं भाग्य मला मिळालं होतं. आज मला माँ कालीचा आशिर्वाद घेण्याचं भाग्य मिळालं. माँ कालीचा अशिर्वाद आपल्यावर आहे. आज मानवजात कोरोनामुळे  संकटांमधून जात आहे. माझी देवीकडे हीच प्रार्थना आहे की संपूर्ण मानवजातील या  संकटातून लवकरात लवकर मुक्त करावं. सर्वे भवंतु सुखिनः जे मंत्र आपण जगत आलोय. वसुदैव कुटुंबकम हे आपले संस्कार असल्याने मी संपूर्ण मानवजातीसाठी प्रार्थना करतो,” असं मोदी म्हणाले.

 

पुढे  मोदींनी, “आज  ५१ शक्तीपिठांपैकी एक असणाऱ्या माँ कालीच्या चरणांचे दर्शन घेतलं. मला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा माझा प्रयत्न असतो की या ५१ शक्तीपिठांपैकी जिथे जिथे शक्य आहे तिथे जाऊन देवीचा आशिर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो,” असं मोदी म्हणाले.

 

“आज जेव्हा मी या पवित्र ठिकाणी आलो. येथे मला माँ कालीच्या पुजेची जत्रा असते त्यावेळी मोठ्या संख्येने सीमेच्या पलीकडून (भारतातून) आणि इकडून अनेक भक्त येथे येत असल्याचं समजलं. त्यामुळे इथे अनेक सर्व भक्तांच्या वापरांसाठी एखादा कम्युनिटी हॉल असणं गरजेचं आहे. स्थानिकांनाही येथे धार्मिक कामासाठी कम्युनिटी हॉल गरजेचा आहे. विशेष म्हणजे आप्तकालीन परिस्थितीमध्ये खास करुन वादळांच्या कालावधीमध्ये हा कम्युनिटी मदतकेंद्र म्हणून वापरता येऊ शकतो. म्हणूनच भारत सरकार इथे हा हॉल उभारणार आहे,” अशी घोषणाही मोदींनी केली. मोदींनी, “मी बांगलादेश सरकारचेही आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आणि प्रकल्पासाठी मान्यता दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो,” असंही म्हटलं.

Exit mobile version