Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बहुळेश्वर येथे गावठी दारुच्या भट्टीवर पोलिसांची धाड

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील बहुळेश्वर येथील गिरणा नदीच्या काठावर एक इसम अवैधरित्या गावठी हातभट्टी दारु बनवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता पाचोरा पोलिसांनी सापळा रचत घटनास्थळावर धाड टाकुन १४ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त करत रसायन व तयार असलेली हातभट्टी दारु नष्ट केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात गावठी हातभट्टी बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील बहुळेश्वर येथील गिरणा नदीच्या काठावर राकेश मंगा गायकवाड रा. बाणगाव रोकडा, ता. चाळीसगाव ह. मु. उत्राण ता. एरंडोल हा २५ वर्षीय इसमाची गावठी हातभट्टी दारुची भट्टी असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना मिळाल्यानंतर १४ मे रोजी पो. नि. राहुल खताळ यांनी पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलिस काॅन्स्टेबल शामकांत पाटील व सचिन पवार हे पथक तयार करुन घटनास्थळी धाड टाकण्याचे आदेश दिले. पो. उ. नि. योगेश गणगे, पो. काॅं. शामकांत पाटील व सचिन पवार यांनी घटनास्थळ गाठत सापळा रचून २ हजार ५०० रुपये किंमतीचे एक १०० लिटर मापाचे पत्री ड्रममध्ये सुमारे ५० लिटर गुळ व मोह मिश्रीत उकळते रसायन, १० हजार रुपये किंमतीचे ५० लिटर मापाचे ४ ड्रम त्यात प्रत्येकी ५० लिटर गुळ व मोह मिश्रीत कच्चे रसायन (एकुण २०० लिटर), २ हजार रुपये किंमतीचे ३५ लिटर मापाची एक प्लास्टिकची कॅन त्यात सुमारे ५० लिटर तयार गावठी हातभट्टी दारु असा माल हस्तगत करत सदरचे रसायन व तयार दारु नष्ट करुन राकेश मंगा गायकवाड याचे विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉन्स्टेबल सचिन पवार हे करीत आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैधरित्या गावठी हातभट्टी दारु पाडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Exit mobile version