Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बस व कारच्या अपघातात तीन ठार, दोन गंभीर

apghat bus

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील विचखेडे गावाजवळ बस आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, धुळे येथील चौधरी कुटुंब हे पाचोरा येथून साखरपुड्यासाठी गेले होते. धुळे येथील संजय नारायण चौधरी (रा. टाटा मोटर्सच्या बाजूला, जेसीबी शोरूम जवळ, धुळे) यांचा मुलगा दिनेश संजय चौधरी याचा साखरपुडा प्रकाश चौधरी (रा. प्रकाश टॉकीज जवळ, पाचोरा) यांच्या मुलीशी रविवारी (दि.९) होता. त्यानुसार धुळे येथून चौधरी कुटुंब आपल्या कार (एम.एच. १८, बी.सी. ०५७५)सह इतर दोन वाहनाने पाचोरा येथे गेले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कार्यक्रम आटोपून धुळ्याकडे यायला निघाले होते. दरम्यान, विचखेडा गावाजवळ धुळ्याकडून पारोळ्याकडे येणारी शिर्डी-भुसावळ बस (एमएच २०, बीएल ३९४३ भुसावळ डेपोची बस) आणि धुळ्याकडे जाणारी कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात नवरदेवाचे वडील संजय नारायण चौधरी (वय ४५), बहीण मीनल संजय चौधरी (वय २३), काकू सरला रवींद्र चौधरी (वय ४५) हे जागीच ठार झाले. आई नीता संजय चौधरी (वय ५०), काका रवींद्र नारायण चौधरी (वय ६८), पुतण्या विवान स्वप्निल चौधरी ( वय ५, सर्व रा. धुळे) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले. तसेच बसमधील सौरभ प्रवीण पाटील (रा. उंदीरखेडे, ता. पारोळा) हा प्रवासीदेखील जखमी झाला असून त्यालाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version