Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बलात्कारी दोषीला पाकिस्तानात नपुंसक करणार

 

 

इस्लामाबाद: वृत्तसंस्था । बलात्कार प्रकरणातील दोषीला इंजेक्शन देऊन नपुंसक करण्याची शिक्षा या कायद्यात असणार आहे. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान इम्रान खान यांनी अशा कायद्याची गरज असल्याचे नमूद केले होते.

बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकार नवीन कायदा आणणार असून त्याच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली आहे.

पाकिस्तानमधील जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्याचा मसुदा सादर करण्यात आला. बैठकीत या कायद्यावर चर्चा करण्यात आली. इम्रान खान यांनी या मसुद्याला मंजुरी दिली असल्याचे वृत्तात म्हटले आहे. मात्र, सरकारकडून अधिकृतपणे यावर कोणतेही भाष्य करण्यात आले नाही.

दोन महिन्यांपूर्वी लाहोरजवळ फ्रेंच नागरीक असलेल्या महिलेवर तिच्या मुलांसमोर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये या घटनेविरोधात लोकांनी विशेषत: महिलांनी मोठा रोष व्यक्त करत आंदोलन केले होते. त्यावेळी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना इम्रान खान यांनी अशा कायद्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. बलात्कार आणि लैंगिक अत्याचारातील दोषींना घेऊन एक ग्रेडिंग सिस्टीम तयार करायला हवी. सर्वात घृणास्पद अपराध करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यायला हवी. जेणेकरून दोषी पुढील वेळी असे कृत्य करण्यासाठीच सक्षम राहणार नाही. अशी शिक्षा इतरांनाही धडा असणार असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले होते. दररोज देशात किती बलात्कार होतात, याची माहिती जमा करणे प्रशासनासाठी आव्हानात्मक असल्याची कबुली इम्रान यांनी दिली होती.

एका इंजेक्शनद्वारे दोषींना नपुंसक करतात. ही एक प्रकारची वैद्यकीय प्रक्रिया आहे. या रासायनिक इंजेक्शनद्वारे व्यक्तीच्या हॉर्मोनवर परिणाम केले जातात. त्यामुळे त्याची लैंगिक क्षमता संपुष्टात येते.

Exit mobile version