Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बलात्काराचा आरोप असलेल्यांना उमेदवारी नाही

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । ज्या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप असेल, अशा कोणत्याही व्यक्तीला बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार नाही, असा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा परिणाम आता बिहारमध्ये होत असलेल्या विधानसक्षा निवडणुकीवरदेखील पडत असल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये दलित मतदारांची संख्या मोठी आहे. राजकीय नेते या घटनेचा उल्लेख सतत करताना दिसत आहेत.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवारांच्या नावांची चर्चा करण्यात आली. बलात्काराचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्षाकडन उमेदवारी दिली जाऊ नये, असे या बैठकीत ठरवण्यात आले. या चर्चेनंतर तीन उमेदवारांची उमेदवारी रोखली गेली आहे. यांमध्ये ब्रजेश पांडे यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

पक्षाच्या महिला नेत्या सुष्मिता देव यांनी या विषयाचा उल्लेख पत्रकार परिषदेत केला होता. बलात्काराचा आरोप असलेल्या कोणत्याही नेत्याला उमेदवारी दिली जाता कामा नये, असे देव यांनी म्हटले होते. जो पर्यंत पर्यंत पीडितेला न्याय मिळणार नाही, तो पर्यंत काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असे त्या म्हणाल्या होत्या.

हाथरस सामूहिक बलात्कार आणि मृत्यूच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी स्वत: हासरथला जात पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. या वेळी त्यांना प्रशासनाशी संघर्ष देखील करावा लागला होता. आता बिहार निवडणुकीत देखील पक्षातर्फे या पार्श्वभूमीवर संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बिहार निवडणुकीत काँग्रेस पक्ष राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करत ७० जागा लढवत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस भारतीय जनता पक्षाला घेरत असताना बिहारमध्येही सतर्कता बाळगत असल्याचे दिसत आहे.

Exit mobile version