Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंद घराचे कुलूप तोडून २२ हजारांचा ऐवज लांबविला

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी २२ हजार ४५० रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, शहरातील पुनगाव रोडवरील आदर्श नगर भागातील रहिवाशी स्वाती बाळासाहेब पाटील ह्या परिवारासह बाहेरगावी गेल्या होत्या. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १६ जानेवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करत घरात ठेवलेले ३ हजार ५०० रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १ हजार ४०० रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २ हजार १०० रुपयांची ३ ग्रॅम वजनाच्या लहान मुलांच्या कानातील सोन्याच्या बाह्या, ७०० रुपये किंमतीचे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम पान व अर्धा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, २ हजार ५०० रुपयांची ५ भार वजनाचे चांदीचे देव, १ हजार २५० रुपये किंमतीची अडीच भार वजनाची चांदीची लक्ष्मीची मूर्ती, १२ हजार रुपये किंमतीचे ३० भार वजनाचे चांदीचे कडे, २ हजार रुपये किंमतीचे ४ भार वजनाचे चांदीचे जोडवे, १ हजार रुपये किंमतीच्या २ भार वजनाच्या चांदीच्या मासळ्या व २ हजार ५०० रुपये किंमतीचे ४ भार वजनाचे चांदीचे कडे असा एकूण २२ हजार ४५० रुपये किंमतीचे सोने व चांदीच्या ऐवज लंपास केल्याने स्वाती पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.

Exit mobile version