Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंगाली मुस्लिमांना देशाच्या नागरिकांच्या यादीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राष्ट्रीय नागरिक नोंदणी अंतिम यादीतून हजारो ‘अपात्र’ व्यक्तींची नावं हटवण्याचे आदेश आलेत. यावर ‘खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. या यादीच्या सहाय्याने बंगाली मुस्लिमांना नागरिकांच्या यादीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ओवैसी यांनी केलाय.

आसाममध्ये एनआरसीचा धोशा भाजपनं लावला होता. आपलं नाव यादीमध्ये समाविष्ट व्हावं यासाठी आसामच्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, भाजपला या गोष्टीची निराशा आहे की या यादीत जास्तीत जास्त मुस्लिमांना बाहेर करण्यात आलेलं नाही. ‘लाखो अवैध प्रवाशां’ची कहाणी खोटी सिद्ध झाली. आता हे लोक अंतिम यादी फेटाळून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण, ‘पुरेशा संख्येत’ बंगाली मुस्लिमांना यादीतून वगळता येईल, असं ट्विट असदुद्दीन ओवैसी यांनी केलंय.

हे लोक प्रशासकीय हुशारी दाखवत आता हे दाखवत आहेत की अंतिम एनआरसी यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे ही यादी बदलता येणं शक्य होईल. परंतु,, यादी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असं ओवैसी यांनी म्हटलंय.

‘एनआरसी यादी प्रसिद्ध केल्यानंतरच एलआरसीआर, डीआरसीआरचा वापर केला जाऊ शकतो. भारताचे कुलसचिवांकडून अद्याप एनआरसी यादी नोटिफाय केलेली नाही. एनआरसी यादी जाहीर झाल्यानंतर यात कोणताही बदल करणं बेकायदेशीर आहे. अनावश्यक लांबलेली ही प्रक्रिया तत्काळ रद्द करावी. यादी नोटिफाय करावी. केवळ तुमच्या राजकीय फायद्यासाठी प्रक्रिया लांबवणं बंद करा’ असंही ओवैसी यांनी म्हटलंय.

Exit mobile version