Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फ्रान्स राफेल फायटर विमानांमध्ये नवीन अस्त्र जोडणार

पॅरिस : वृत्तसंस्था । फ्रान्स भारताला पुरवठा करणाऱ्या राफेल फायटर विमानांमध्ये एक नवीन अस्त्र जोडणार आहे. मिका, मिटिओर, स्काल्प या क्षेपणास्त्रांइतकेच हे नवीन स्मार्ट वेपन घातक आहे.

मिका, मिटिओरी ही क्षेपणास्त्रे हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकतात तर स्काल्प हे दूर अंतरावरुन जमिनीवरील लक्ष्यावर अचूकतेने प्रहार करु शकते.
आता या क्षेपणास्त्रांच्या जोडीला ‘हॅमर’ हे नवीन अस्त्र येणार आहे. भारताला सोपवण्यात येणारी राफेल विमाने हॅमर अस्त्राने सुसज्ज करण्यास फ्रान्स राजी झाला आहे.

हॅमर हे एक फायर आणि फर्गेट वेपन आहे. हॅमर हा एक ‘गायडन्स किट’ आहे. म्हणजे ज्याला मार्गदर्शक म्हणता येईल. या किटमध्ये Mk80 सीरीजचे बॉम्ब वापरावे लागतील. हॅमर जीपीएस शिवाय ७० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूकतेने वेध घेऊ शकते.

दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये राफेलसोबत हॅमर वेपन देण्याचा करार झाला. फ्रान्सची डिफेन्स कंपनी साफरानकडून हॅमरची किटची निर्मिती केली जाते. हॅमर विकत घेतल्यानंतर आपल्याला Mk80 सीरीजचे बॉम्ब आयात करावे लागतील.

शत्रूच्या टप्प्यात न येता शत्रूच्या प्रदेशातील खोलवर भागातील लक्ष्याचा अत्यंत अचूकतेने वेध घेता येतो. डोंगराळ भागासह कुठल्याही भागातील शत्रूने बनवलेले मजूबत बंकर हॅमर बॉम्बने उद्धवस्त करता येतील. सध्या पूर्व लडाखमध्ये जो, तणाव निर्माण झालाय तो उंच पर्वतीय भाग आहे.

भारताने मागच्यावर्षी बालाकोट एअर स्ट्राइकच्यावेळी स्पाइस २००० बॉम्बचा वापर केला होता. हॅमर सुद्धा स्पाइस सारखाच स्मार्ट बॉम्ब आहे. भारताने दोन ते तीन वर्षांपूर्वीच हॅमर स्मार्ट बॉम्बची खरेदी करण्यासाठी बोलणी सुरु केली होती.

राफेल ही भारताच्या ताफ्यातील सर्वात अत्याधुनिक विमाने आहेत. २९ जुलैला पाच राफेल विमानांची पहिली तुकडी दाखल झाली. काल आणखी तीन राफेल विमाने दाखल झाली. हॅमरमुळे एअर फोर्सची शक्ती कैकपटीने वाढेल. चीन-पाकिस्तानमध्यो खोलवर अचूकतेने प्रहार करता येऊ शकतो

Exit mobile version