Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फ्रान्समध्ये राफेल घोटाळ्याची चौकशी; “चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झाले — नाना पटोले

 

 

मुंबई: वृत्तसंस्था । राफेल लढाऊ विमान  खरेदी करारानंतर डसॉल्ट कंपनीने भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरोंची लाच दिल्याचे फ्रान्समध्ये सुरु असलेल्या चौकशीतून समोर आले असून ‘चौकीदार ही चोर है’, हे सिद्ध झाले असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

 

राफेल लढाऊ विमान खरेदीत  मोठा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उघड केले होते. मात्र सातत्याने खोटे बोलून व खोटी कागदपत्रे दाखवून केंद्र सरकारने या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचे काम केले होते   असेही ते म्हणाले .

 

ते  मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत 2016 मध्ये करार झाला. त्यानंतर डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी रक्कम दिली. 2017 मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून ‘गिफ्ट टू क्लाएंट’ म्हणून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आल्याचे पटोले यांनी सांगितले.

 

फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था  एएफएने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. यावरून राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. राहुल गांधी व काँग्रेस पक्षाने सातत्याने मागणी केल्याप्रमाणे या खरेदी कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी केल्यास  सत्य समोर येऊन खरे चोर सापडतील असे नाना पटोले म्हणाले.

 

राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा फ्रान्सच्या मीडियापार्ट या संकेतस्थळाने केला आहे. यामध्ये भारतीय मध्यस्थाला 10 लाख युरोंचे गिफ्ट देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राफेल प्रकरण पुन्हा मोदी सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Exit mobile version