Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपुरात महाविष्णू यागानिमित्त शोभायात्रा

mahavishnu yaga

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथे आयोजित करण्यात आलेल्या २७ कुंडी महाविष्णू याग महोत्सवाची सुरूवात शोभायात्रेने करण्यात आली.
फैजपुर येथे दिनांक २७ ते तीन फेब्रुवारी दरम्यान साजरा होणार्‍या २७ कुंडी महाविष्णू याग महोत्सव–व नाम संकिर्तन महोत्वाची रविवारी शोभायात्रेने सुरुवात झाली. शहरातून निघालेल्या या भव्य शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. खंडोबा वाडी देवस्थान मध्ये हा २७ कुंडी महाविष्णू याग महोत्सव साजरा होत आहे. याच ठिकाणाहून रविवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या अग्रस्थानी विठ्ठल-रुक्मिणीचा सजीव देखावा दाखविण्यात आलेला होता. त्यानंतर शोभायात्रेत डोक्यावर तुळशीपत्र तसेच भागवत ग्रंथ घेतलेल्या महिला सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. या शोभायात्रेत सजविलेल्या बग्गीतून
महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज व प्रसाद महाराज तसेच कुसुंबा येथील महंत भरत दास महाराज व संतांना बसवण्यात आलेले होते.

ही शोभायात्रा खंडोबा देवस्थान, रथ गल्ली, लकड पेठ, सुभाष चौक या मार्गाने रोड सुभाष चौक त्यानंतर पुन्हा खंडोबा वाडीत येऊन समाप्त झाली. २७ कुंडी महाविष्णू यागा निमित्त महोत्सव समितीतर्फे तयारी पूर्ण झालेली असून भव्य व आकर्षक यज्ञशाळा तसेच नाम संकिर्तन महोत्सवासाठी भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे या महोत्सवात दररोज नामांकित कीर्तनकार यांचे कीर्तन आयोजित करण्यात आलेली आहे.

Exit mobile version