Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फेब्रुवारीपर्यंत भारतात कोविड-१९ च्या दोन लशी उपलब्ध होण्याची आशा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । फेब्रुवारी २०२१ पर्यंत देशात कोविड-१९ च्या दोन लशी उपलब्ध होऊ शकतात. एक म्हणजे ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची एक लस आणि दुसरी म्हणजे भारत बायोटेकची Covaxin ही लस

देशातील फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाची (SII) लस आणीबाणीच्या स्थितीत वापरण्यासाठी मंजुरी देण्याची सरकारची देखील तयारी आहे. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या या लशीला देखील तातडीची मंजुरी मिळेल याची वाट पाहिली जात आहे.

सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने एस्ट्राजेनेकाशी भागीदारी केली आहे. देशात बनलेली म्हणजेच भारत बायोटेकची Covaxin या लशीला देखील फेब्रुवारीपर्यंत तातडीची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ४४ हजार ०५९ नवे रुग्ण आढळले असून ५११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीनंतर देशातील एकूण ९१ लाख ३९ हजार ८६६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३३ हजार ७३८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. देशात एकूण ४ लाख ४३ हजार ४८६ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ८५ लाख ६२ हजार ६४२ रुग्ण बरे झाले असून गेल्या २४ तासांत ४१ हजार ०२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

केंद्र सरकार लस निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांच्या संपर्कात आहे. योग्य त्या प्रमाणात डोस प्राप्त व्हावे हा यामागील उद्देश आहे. लोकसंख्येचा विचार करता सरकार मोठ्या प्रमाणात लस खरेदी करणार आहे. सीरम इन्स्टीट्यूटच्या लशीची किंमत ५०० ते ६०० रुपयांच्या दरम्यान असणार आहे. मोठ्या प्रमाणात लस खरेदी करण्यात येणार असल्याने सरकारला मात्र ही लस अर्ध्या किंमतीत उपलब्ध होणार आहे.

सरकारने प्राथमिकतेच्या आधारे २५ ते ३० कोटी लोकांना लस टोचण्याचा विचार केला आहे. यासाठी ५० ते ६० कोटी डोसची आवश्यकता भासणार आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये देशभरातील ७० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि २ कोटींहून अधिक फ्रंटलाइन वर्कर्स- पोलिस, महापालिका कर्मचारी, सेना अशांना लस टोचण्याची योजना आहे. लाभार्थ्यांची पहिली सूची तयार करण्यात आली आहे.

भारत बायोटेकच्या Covaxin या लशीला देखील टप्पा १ आणि टप्पा २ चा डेटा सादर केल्यानंतर तातडीची मंजुरी मिळू शकते. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असलेल्या या लशीचा डेटा तयार होत आहे. सीरम इन्स्टीट्यूटने ब्रिटनचा एफिसेसी डेटा सादर केला तर या लशीला सहज मंजुरी मिळू शकते, भारत बायोटेकनेही अर्ज सादर केला, तर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील डेटाच्या आधारावर या लशीलाही मंजुरी मिळू शकते. चाचणीत सर्वकाही ठीक असेल तर फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत एकापेक्षा अधिक लशी उपलब्ध होऊ शकतात असे स्पष्ट संकेत आहेत.

सीरम इन्स्टीट्यूट डिसेंबरमध्ये भारतीय रेग्युलेटरकडे तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. सर्वकाही योजनेनुसार झाले आणि कंपनीला (SII) डिसेंबरमध्ये तातडीची मंजुरी मिळाली, तर जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये लशीची पहिली खेप उपलब्ध होऊ शकते SII ने लशीची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल जवळजवळ पूर्ण केली आहे आणि डेटा फॉलोअप लवकरच होण्यची शक्यता आहे. भारतात ही लस कोव्हिशील्ड (Covishield) या नावाने उपलब्ध होईल.

 

Exit mobile version