Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फुकटात बिर्याणी : ऑडिओ क्लिपची चौकशी करा — पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे

 

 

पुणे : वृत्तसंस्था । फुकटात बिर्याणीबद्दलच्या  ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे. त्यानंतरच सत्य समोर येईल. गृहमंत्र्यांनी जे सांगितलं , त्यावरून सर्वकाही स्पष्ट होईल. हे माझ्या विरुद्धचं षडयंत्र आहे.” असं म्हणत पुण्याच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली

 

पुणे पोलीस दलात सध्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. यामध्ये पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे? अशी विचारणा करताना दिसत आहे. तर, या संभाषणातील महिला अधिकरी म्हणजे पुण्याच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे असल्याचे समोर आल्यानंतर यावर स्वतः पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी आपली बाजू मांडली आहे.

 

पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे म्हणाल्या की, “ माझ्या झोनमध्ये काही कर्मचारी होते जे बऱ्याच वर्षांपासून ठाण मांडून बसलेले होते. त्यामुळे त्यांचे काही आर्थिक हितसंबंध जुडलेले होते. हप्तेगिरी तिथे चालत होती. माझ्या अगोदर जे अधिकारी काम करत होते, ते देखील यामध्ये सहभागी आहेत. बदल्यांच्या काळातच ही मॉर्फ क्लिप बाहेर का आणली गेली? ही संपूर्ण क्लिप माझी नाही. माझ्या विविध संभाषणांमधील वाक्य यामध्ये जोडलेले आहेत. यातील काही भाग जो आहे तो मी बोलली नाही. ही संपूर्णत: मॉर्फ क्लिप आहे, याबाबच चौकशी झाली पाहिजे  मी या विरोधात सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल करणार आहे.”

 

महेश साळुंके म्हणून जे कर्मचारी माझ्या कार्यालयात होते, त्यांच्यासोबत जे दुसरे कर्मचारी होते ज्यांना १२ वर्षे झाली होते, त्यांच्याबाबत मी डिफॉल्ट रिपोर्ट पाठवला होता, जे तिथे हप्तेखोरी करत होते. हे सगळं मी येण्या अगोदर व्यवस्थित सुरू होतं आणि मी आल्यानंतर ते सगळं काही बंद झालं. त्यामुळे या सर्वांचे हीतसंबंध फार दुखावले गेले आहेत आणि म्हणून माझी इथून उचलबांगडी व्हावी व त्यांचं जे अगोदर सुरू होतं ते सुरू रहावं यासाठी केलेला हा कट आहे. यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील त्यांना पाठींबा आहे. त्यांच्याच आदेशाने व निदर्शनात हे सुरू आहे. माझ्या करिअरला नुकसान व्हावं, म्हणून हे केलं गेलं आहे.” असंही यावेळी पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितलं आहे.

 

ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून पुणे पोलीस दलात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील या ऑडिओ क्लिपची दखल घेतली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे.

 

Exit mobile version